राहुरी पंचायत समिती समोर आमरण उपोषण

राहुरी तालूक्यातील मोमीन आखाडा येथे शासनाच्या जागेत झालेल्या अतिक्रमणावरून दोन कुटूंबात गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहेत. दोन्ही कुटूंबांनी अनेक वेळा परस्पर विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. तर अतिक्रमण बाबत दोन्ही कुटूंबांनी परस्पर विरोधात पंचायत समिती कार्यालय समोर उपोषण सुरू केले आहे.
बबन तुळशीराम कोळपे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, मोमीन आखाडा परिसरात कैलास भानुदास मोहिते यांनी अनाधिकृतपणे घराचे बांधकाम करून वहिवाटीचा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे सदर अनाधिकृत असलेले बांधकाम पाडून जमीनदोस्त करण्यात यावे. आणि वहिवाटीचा रस्ता खुला करण्यात यावा. या मागणीसाठी बबन कोळपे यांनी वेळोवेळी उपोषण केले. मात्र त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळेच बबन कोळपे यांनी दिनांक २९ नोव्हेंबर पासून पुन्हा उपोषण सुरू केले.


तसेच कैलास भानुदास मोहिते यांनी बबन कोळपे यांना अटकाव करण्यासाठी त्याच वेळी उपोषण सुरू केले. कैलास मोहिते यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, मोमीन आखाडा परिसरात गट नंबर ७०५/१ मध्ये कैलास मोहिते यांनी पक्के घराचे बांधकाम केले आहे. त्याच ठिकाणी बबन कोळपे हे अतिक्रमण करुन राहत आहेत. काही वर्षांपासून बबन कोळपे हे वाद विवाद करत आहेत. विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी व ग्रामस्थ यांच्या समोर काही दिवसांपूर्वी रस्त्याची मोजणी करून १३ फूटाचा रस्ता करण्यात आलाय. त्याप्रमाणेच कैलास मोहिते यांनी त्यांच्या घराचे बांधकाम केले आहे. बबन कोळपे हे वैयक्तिक द्वेषातून त्रास देण्याचे काम करत आहेत.
७०५/१ या गटामध्ये सुमारे २०० पेक्षा जास्त अतिक्रमण आहेत. मोहिते यांनी बांधकाम केलेले घर शासनाच्या नियमा प्रमाणे नियमानुकूल करण्यात यावे. किंवा जेवढे अतिक्रमण आहेत. ते सर्व निष्काशीत करण्यात यावे. या मागणीसाठी कैलास मोहिते यांनी उपोषण सुरू केले आहे.
राहुरी पंचायत समिती कार्यालय समोर बबन कोळपे व कैलास मोहिते हे दोघे परस्पर विरोधात समोरा समोर उपोषण बसले आहेत.