
अहिल्यानगरमध्ये मोठा गोंधळ उडवणारा प्रकार उघडकीस आला आहे. बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील आरोपी सागर भिंगारदिवे याच्यासह ७०-८० समर्थकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घटना कशी घडली?
शुक्रवारी सागर भिंगारदिवे जामिनावर सुटल्यावर सबजेल कारागृहाबाहेर त्याचे फटाक्यांनी स्वागत करण्यात आले. समर्थकांनी त्याला उचलून घेत, चारचाकी गाडीतून मिरवणूक काढली आणि मोठा जमाव घोषणाबाजी करत होता.
सबजेल ते केडगावपर्यंत ही मिरवणूक निघाली.
रस्त्यावर आरडाओरडा आणि वाहतूक कोंडी झाली.
याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पोलीस कारवाई
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी व्हिडीओची चौकशी करून भिंगारदिवेसह ७०-८० अनोळखी समर्थकांवर गुन्हा दाखल केला.
मिरवणुकीत वापरलेली वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
कडक इशारा
“रस्त्यावर मिरवणूक, वाढदिवस साजरे करत समाजात दहशत निर्माण केली, तर आरोपी व त्यांच्या समर्थकांवर कडक कारवाई होईल!” – जिल्हा पोलिस अधीक्षक घार्गे यांचा इशारा.
समाजात कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या अशा प्रकारांना आता पोलिसांचा सज्ज प्रत्युत्तर मिळणार आहे.