दारू पिऊन झालेल्या भांडणात खून करणाऱ्या आरोपी संगमनेर पोलिसांकडून जेरबंद

संगमनेर —- नाशिक -पुणे महामार्गावरील सर्व्हीस रोडच्या कडेला घुलेवाडी शिवारातील बायपासवर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आणि त्याचा खून (Murder) करणाऱ्या आरोपीस जेरबंद  करण्यास संगमनेर शहर पोलिसांना यश आले आहे. तब्बल एक महिन्यानंतर पोलिसांनी तपास करत चंदनापुरी येथील मनोज बाळासाहेब राहाणे यास पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण गावातून गजाआड केले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 12 नोव्हेंबर 2021 रोजी नाशिक -पुणे महामार्गावरील सर्व्हीस रोडच्या कडेला घुलेवाडी शिवारातील बायपासवर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला  पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात वैद्यकीय अधिकार्‍यांनी गंभीर जखमा व मारहाणीमुळे सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे नोंदविण्यात आले. त्यामुळे सदर व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी खून (Murder) केल्याची पोलिसांची खात्री झाल्याने 31 डिसेंबर 2021 रोजी खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास  पोलीस निरीक्षक मुकंद देशमुख यांनी स्वतः सुरू केला. दरम्यान पोलिसांना 4 जानेवारी 2022 रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, घुलेवाडी शिवारात आढळून आलेले प्रेत हे अमोल मोहन तरकसे (रा. तरकसवाडी, ता. राहाता) यांचे असून त्याचा खून मनोज बाळासाहेब राहाणे (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) याने केला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शोध सुरु केला. याबाबत सदर आरोपी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील भिगवण गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. अण्णासाहेब दातीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, पो. कॉ. अमृत आढाव, पो. कॉ. सुभाष बोडखे, पो. कॉ. प्रमोद गाडेकर, पो. कॉ. गणेश शिंदे, पो. ना. फुरकान शेख यांचे पथक आरोपी पकडण्यासाठी रवाना केले. पथकाने भिगवण गावातून आरोपी मनोज राहाणे यास अटक केली. पोलिसांनी आरोपीकडे गुन्ह्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मनोज बाळासाहेब राहाणे (वय 23, रा. चंदनापुरी ता. संगमनेर) याने सांगितले की, मयत अमोल मोहन तरकसे (वय 37, रा. तरकसवाडी, ता. राहाता) हा घारगांव येथील किशोर डोके यांच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामास होता. मनोज राहाणे हा देखील त्यांचेकडे वेल्डर म्हणून काम करत होता. त्याच ठिकाणी दोघांची ओळख झाली होती. ते दोघेही नेहमी एकत्र दारु पित होते. दि. 11 नोव्हेंबर 2021 रोजी दोघांनी एकमेकांना फोन करून दारू पिण्याचे नियोजन केले होते.

दारू पिल्यानंतर दोघांमध्ये झालेल्या भांडणात राहाणे याने तरकसे यास लाथाबुक्क्याने मारहाण केली व त्याचा शर्ट फाडला तसेच त्याचे डोक्याचे केस धरून पाच ते सहा वेळा दगडावर आपटले. त्यामुळे तो बेशुध्द झाला. त्यास त्याच अवस्थेत सोडून मनोज राहाणे याने तेथून पळ काढला. त्यानंतर राहाणे याने पुन्हा त्या रात्री 1 वाजता सदर ठिकाणी जाऊन पाहिले तर अमोल मयत झाला होता. आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये व त्याचे ओळख पटूू नये म्हणून त्याचे चेहर्‍यावर पुन्हा दगडाने मारहाण केली व त्याचे खिशामधील मोबाईल घेऊन मनोज राहाणे हा फरार झाला असल्याची कबुली आरोपी मनोज राहणे याने दिली.