दुचाकी डिक्कीतून साडेचार लाखांची रक्कम चोरली

घरासमोर उभी केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लाख रूपये असलेली बॅग दोघा चोरांनी चोरल्याची हि घटना  सारसनगर परिसरात  घडली आहे. चोरटे दुचाकीवरून बॅग घेवुन जाताना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, भिंगार पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल शिवाजी कोळेकर (रा. सारसनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

कोळेकर यांनी मार्केट यार्ड परिसरातील मर्चंट बँकेतून साडेचार लाख रूपयांची रक्कम काढली होती. कोळेकर यांना ती रक्कम त्यांचे मालक शिवाजी पाटील यांना द्यायची होती. कोळेकर यांनी बँकेतून काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून ते दुचाकी घेवुन सारसनगर येथील घरी गेले. दुचाकी घरासमोर उभी करून ते जेवण करण्यासाठी घरात गेले. त्याचवेळी चोरांनी संधी साधून सदरची रक्कम असलेली बॅग चोरली.

जेवण झाल्यानंतर कोळेकर दुचाकी घेवुन मालकाकडे गेले. त्यावेळी दुचाकीच्या डिक्कीत रक्कम नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. रक्कम चोरीला गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.