देविदर्शनावरून परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे मंगळसुत्र ओरबडले

नगर — शुक्रवारी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने मैत्रिणीसह केडगाव येथील देवी दर्शनाला गेलेल्या भिंगार येथील महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे मंगळसूत्र पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी गळ्यातून ओरबाडून लुटल्याची घटना घडली आहे.

भिंगार येथील अंकिता ओंकार वाघस्कर (वय26, व्यवसाय-नोकरी, राह- रामकृष्ण बंगला, हनुमान मंदिरा समोर, वाडारवाडी, भिंगार) या मैत्रीण योगिता धरासह यांच्या संक्रातीच्या सणानिमित्ताने  केडगाव देवीचे दर्शन करून आपल्या स्कुटी वाहनवरून परतत असताना दुपारी पावणेतीनच्या सुमारास केडगाव देविरोड, वीटभट्टी या ठिकाणी पल्सर मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी अंकिता वाघस्कर यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र ओरबडून धूम स्टाईल पसार झाले.

याबाबत दोन अज्ञात आरोपींवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे पुढील तपास करत आहेत. घटने नंतर घटनास्थळी शहर उपअधीक्षक अनिल कातकडे, पो नि संपत शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.