धूम स्टाईलने पाच तोळ्याचे गंठण केले लंपास

खरेदी करण्यासाठी राहुरी शहरात आलेल्या सुनिता देव्हारे या महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रूपये किंमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागीने मोटारसायकल वर आलेल्या दोन भामट्यांनी धूम स्टाईलने ओरबडून धुम ठोकली. ही घटना काल दिनांक २६ डिसेंबर रोजी सायंकाळी राहुरी शहर हद्दीत घडली.
सुनिता आदिनाथ देव्हारे राहणार उंबरे ता. राहुरी. तसेच त्यांच्या सोबत आणखी एक महिला त्या दोघी काल दिनांक २६ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वाचार वाजे दरम्यान राहुरी शहरात खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्या दोघी भागीरथीबाई शाळे समोरून पाण्याच्या टाकी कडे पायी जात होत्या. त्या ठिकाणी असलेल्या आपला बाजार या दुकानच्या परिसरात त्यांच्या पाठीमागून मोटारसायकल वर दोन अज्ञात भामटे आले. यावेळी त्यांनी सुनिता आदिनाथ देव्हारे यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे गंठण व अडिच तोळे वजनाचे मनी मंगळसूत्र असे सुमारे दोन लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने ओरबडले. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली. मात्र काही क्षणात सदर दोन्ही भामटे आलेल्या मार्गाने सुवाट वेगात निघून गेले.
परिसरातील काही तरूणांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र ते हाती लागले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. पोलिस उप निरीक्षक मधुकर शिंदे, पोलीस नाईक प्रवीण खंडागळे, सचिन ताजणे, सचिन लोंढे, एकनाथ आव्हाड, शिवाजी खरात, चालक बोडखे आदि पोलिस पथकाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले. पोलिस पथकाकडून आरोपींचा शोध घेण्यात आला. मात्र आरोपी मिळाले नाहीत.
या घटने बाबत रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.