निमगाव वाघात ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी

गरजूंवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

कोरोनाने सर्वांचे आर्थिक नियोजन विस्कटले आहे. खर्चिक आरोग्य सुविधा अवाक्याबाहेर गेले असून, मोफत शिबीरामुळे सर्वसामान्यांना आधार मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये वयोमानानुसार नेत्रदोष निर्माण होत असताना  गावात घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबीराने अनेकांना नवदृष्टी मिळणार असल्याचे प्रतिपादन माजी सरपंच साहेबराव बोडखे यांनी केले.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, निमगाव वाघा ग्रामपंचायत, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, सावली चॅरिटेबल फाऊंडेशन व आनंदऋषीजी नेत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी माजी सरपंच बोडखे बोलत होते. गावातील नवनाथ मंदिराच्या सभा मंडपात झालेल्या शिबीराप्रसंगी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, भाऊसाहेब ठाणगे, डॉ. विजय जाधव, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, डॉ. दिलीप भालेराव, डॉ. सादिका शेख, डॉ. मनिषा जगताप, सायली भालेराव, सावली जगताप, सुमन जगताप, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, नवनाथ फलके, प्रतिभा डोंगरे, अप्पा जाधव, शिवाजी कापसे, मंदाताई डोंगरे, अरुण काळे, अनिल डोंगरे, बाळू गायकवाड, सिताराम कापसे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात नाना डोंगरे यांनी संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजू घटकांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य केले जात आहे. गावातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना नेत्र विकार असून, त्यांना चांगली दृष्टी मिळण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबीरात 125 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. 9 गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच शिबीरार्थींना अल्पदरात नंबरचे चष्मे उपलब्ध करुन देण्यात आले होते. आभार प्रियंका डोंगरे-ठाणगे यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या शिबीरासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.