पंतप्रधानांच्या लोकसभेतील भाषणावर आक्षेप घेत शहर काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने

मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी - किरण काळे

नगर : लोकसभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरवला असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे तीव्र पडसाद नगर शहरामध्ये उमटले. काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली वाडीया पार्क येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, विधिमंडळ पक्षाचे नेते मंत्री ना. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून काँग्रेसने शहरात निदर्शने केली. राज्यभरात काँग्रेसच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्राबद्दल थोडी जरी आत्मीयता असेल तर त्यांनीच महाराष्ट्रद्रोही मोदींचा निषेध करण्यासाठी पुढे यायला पाहिजे. देशातील भाजप सरकार हे महाराष्ट्र द्रोही असल्याची टीका करत यावेळी काळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

काळे पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदींनी नमस्ते ट्रम्प केलं नसतं तर भारतात कोरोना पसरला नसता. मोदीच खरे कोरोना स्प्रेडर आहेत. कोरोना संकट काळात काँग्रेसने गोरगरीब मजुरांना मदत केली. मजुरांना अन्न उपलब्ध करून दिलं. मजुरांना घरी पोचवण्यासाठी मदत केली. जर मोदींना गोरगरीब मजुरांना काँग्रेसने केलेली ही मदत गुन्हा वाटत असेल तर, होय, काँग्रेसने हा गुन्हा केला आहे. या गुन्ह्यासाठी आम्हाला काय शिक्षा द्यायची ती शिक्षा द्या, तुरुंगात टाका, आम्ही तयार आहोत असे खडे बोल काळे यांनी भाजपला सुनावले आहे.

यावेळी मनपा माजी विरुद्ध पक्ष नेते दशरथ शिंदे, ब्लॉक  अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, क्रीडा जिल्हाध्यक्ष प्रवीण भैय्या गीते पाटील महिला जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, काँग्रेस महासचिव अन्वर सय्यद, जरिना पठाण, कौसर खान, बिबीशन चव्हाण, प्रशांत जाधव, सागर ईरमल, जुबेर सय्यद , रवींद्र पवार, हनीफ जागीरदार, शंकर आव्हाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.