पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने प्रजासत्ताक कर्तव्य आग्रह मोहिम

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने प्रजासत्ताक कर्तव्य आग्रह मोहिम जारी करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून गुट्टलबाज, भाडभ्रष्ट पुढार्‍यांचा सत्तेतून पाय उतार करण्यासाठी जय शिवाजी, जय डिच्चू कावा हे तंत्र प्रजासत्ताक कर्तव्याचा अग्रभाग म्हणून राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भ्रष्टाचाराची गंगोत्री ही निवडणुकींमधील मत खरेदी-विक्री, कोंबडी, दारू यांचे अमिष तर जाती-धर्माचा दुराभिमान यामध्ये आहे. गेली पंच्यात्तर वर्षे मागच्या दाराने मोठ्या संख्येने गुट्टलबाज, सत्तापेंढारी संसदेत किंवा विधिमंडळात निवडून गेले. त्यांनी सत्ता काबीज केली याच कारणामुळे देशातील गरिबी आणि बेकारी वाढली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. यापुढे संसदीय मार्गाने निवडून जाणार्‍या उमेदवाराला त्याच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे थोडे तरी गुण असावेत, याची प्रचिती मतदारांना द्यावी लागेल. अन्यथा डिच्चू कावा तंत्र उमेदवाराविरुद्ध सर्रास वापरला जाऊ शकणार असून, त्यातून देशातील संसदीय लोकशाहीचे शुद्धीकरण झाल्याशिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भाडभ्रष्ट गुट्टलबाज सत्तापेंढार्‍यांच्या चुलीत पाणी ओतल्याशिवाय देशातील भ्रष्टाचार, अनागोंदी, टोलवाटोलवी थांबणार नाही आणि देशातील जनतेला अमृत महोत्सवी वर्षात सुद्धा स्वातंत्र्याची फळे मिळणार नाहीत. यासाठी प्रजासत्ताक कर्तव्य आग्रह मोहिम जारी करण्यात आली आहे. भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार दिले. परंतु प्रजासत्ताक राबविताना प्रत्येक नागरिकांवर काही मूलभूत कर्तव्य ठेवण्यात आली आहे. याची जाणीव देशातील जनतेला नाही. यामुळे भ्रष्ट सत्तापेंढारी यशस्वी होत आहे. यापुढे मतदारांना मतदान करणे, हा प्रजासत्ताक कर्तव्याचा भाग नक्कीच ठरणार आहे. त्याचबरोबर अंतरात्म्याचा आवाज ऐकूनच योग्य त्या उमेदवाराला मतदान करता येईल आणि त्याच वेळेला सत्तापेंढार्‍यांना डिच्चू काव्यातून कायमचे दूर ठेवता येईल यासाठी प्रजासत्ताक कर्तव्य आग्रह मोहिम जारी करण्यात आली असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, यमनाजी म्हस्के, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, अ‍ॅड. गवळी, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.