मोक्का खटल्यातील आरोपींची जामीनावर सुटका

येथील सोलापूर महामार्गावरील छावणी परिषदेच्या टोल नाक्यावर 20 नोव्हेंबर 2020 रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. सदर गुन्ह्यातील आरोपींवर पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. गाजलेल्या या मोक्का खटल्यामध्ये विशेष न्यायालयाने आरोपी बाबा उर्फ भाऊसाहेब सोपान आढाव, विक्रम आनंदा गायकवाड व बाळासाहेब रमेश भिंगारदिवे यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातील त्रुटी विचारात घेऊन विशेष न्यायालयाने आरोपींना जामीन अर्ज मंजूर केला आहे. या गुन्ह्यात याआधी आरोपी संदीप शिंदे, प्रकाश भिंगारदिवे व संदीप वाघचौरे यांचाही जामीन अर्ज विशेष न्यायालयाने मंजूर केलेला आहे. या सर्व आरोपींची बाजू विशेष न्यायालयासमोर अ‍ॅड. परिमल कि. फळे यांनी मांडली. त्यांनी केलेला युक्तिवाद विशेष न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपींना 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहे. अ‍ॅड. परिमल कि. फळे यांना अ‍ॅड. सागर गायकवाड, अ‍ॅड. अभिनव पालवे, अ‍ॅड. प्राजक्ता आचार्य यांनी सहकार्य केले.