राजधर्म म्हणून भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी विरुध्द डिच्चू कावा तंत्राचा अवलंब करावा

आदर्श समाज घडविण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रजासत्ताकातील राजधर्म म्हणून भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी विरुध्द डिच्चू कावा तंत्राचा अवलंब करण्याचे आवाहन पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आले आहे. भाडभ्रष्ट पुढार्‍यांचा बिमोड करण्यासाठी सर्वसामान्यांना डिच्चू कावा मिळालेले अस्त्र असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
मतदाता प्रजासत्ताकातील सर्वोच्च सत्ताधारी असतो. त्याने देशाच्या भल्यासाठी काम करणार्‍यांना मत दिले पाहिजे आणि जो भाडभ्रष्ट, उन्मत्त आणि दहशत माजविणार्‍या उमेदवाराविरुद्ध डिच्चू कावा तंत्र वापरला पाहिजे. यामुळे घराघरात डिच्चू कावा गेल्याशिवाय राहणार नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध व्यापक लढा सुरू ठेवला आहे. मतदारांनी प्रजासत्ताक राजधर्म खर्‍या अर्थाने पाळल्यास भ्रष्ट उमेदवारांना सत्तेपासून दूर ठेवता येणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
प्रजासत्ताकातील राजधर्म म्हणून डिच्चू कावा तंत्राचा वापर केल्यास नव्या पिढीला चांगले दिवस येऊ शकतील. भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी विरुद्ध डिच्चू कावा करुन देशहितवादी उमेदवारांना निवडून दिल्यास बदल घडणार आहे. देशात गुप्त मतदान पद्धतीचा वापर केला जात असल्याने भ्रष्ट लोकप्रतिनिधी विरुद्ध डिच्चू कावा करणे सहज शक्य आहे. यामुळे देशातील भ्रष्टाचार कायमचा संपण्यासाठी मदत होणार असून, जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्रामुळे क्रांती होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पासून जय शिवाजी, जय डिच्चू कावा मोहिम व्यापक करण्याचा संघटनेचा मानस आहे. डिच्चू काव्याने क्रांती होऊन शासन-प्रशासना मधील अनागोंदी, भ्रष्टाचार टोलवाटोलवी दूर होणार आहे. धर्मवेड्या आणि भ्रष्टाचारी अशा लोकांना सार्वजनिक सत्तेपासून दूर ठेवण्याचा हा लोकशाहीतील एकमेव मार्ग आहे. धर्मवेडे आणि जातीमंडूक पुढारींनी मतदारांना वेठीस धरून सत्ता काबीज केली. या अभियानाद्वारे सर्वसामान्य माणसांमध्ये चेतना विकसित करुन बदल घडविण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने म्हंटले आहे.