राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीच्या वतीने अहमदनगर येथील नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र बोरुडे यांना नुकतेच प्रदान करण्यात आले आहे.
फिनिक्स सोशलफाउंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मोफत शिबिरे आयोजित करून सर्वसामान्य गरजू रुग्णांच्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्या आहेत. फाउंडेशनने एकतीस वर्षाच्या कार्यकाळात दोन लाख सदोतीस हजार पाचशे बावन्न रुग्णांना शिबिराच्या माध्यमातून दृष्टी दिलेली आहे. तसेच नेत्रदान चळवळीत भरीव कार्य करून मरणोत्तर नेत्रदानातू एक हजार दोनशे नऊव्वद दृष्टीहीनांना नवदृष्टी दिली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक नागरिकांना मरणोत्तर नेत्रदान करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.
कोरोना काळात देखील नियमांचे पालन करून कोणत्याही प्रकारची मदत न घेता फिनिक्स फाउंडेशनने सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. या निस्वार्थ भावनेने सुरु असलेल्या कार्याची दखल घेत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बोरुडे यांचा राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती (नवी दिल्ली) चे अध्यक्ष जयशंकर थॉमस यांनी त्यांच्या कार्याचा विशेष गौरव केला आहे.