वन विभागाच्या कळवातणी दर्‍यात सर्रास सुरु असलेला अवैध वाळू उपसा थांबवावा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

वन विभागाच्या हद्दीतील कळवातणी (ता. राहुरी) दर्‍यात सर्रास सुरु असलेला अवैध वाळू उपसा वर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
राहुरी तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या कळवातणी दरा येथे खुलेआम अवैध वाळू उपसा सुरु आहे. वन विभागातील अधिकार्‍यांशी अर्थपुर्ण संबंध ठेऊन हा वाळूउपसा सुरु असून, वन विभागाचे संबंधित अधिकारी वाळू तस्करांना पाठिशी घालत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. वन जमीनीचे रक्षण करणारे अधिकारीच भक्षक बनले असून, अवैध व्यवसायाला पाठबळ देत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सुरु असलेल्या अवैध वाळू उपसावर कारवाई करुन सदर प्रकार त्वरीत थांबवावा, जमीनीचे पंचनामे करुन या प्रकरणातील जबाबदार अधिकार्‍यांची चौकशी करावी व दोषी अधिकारींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा उपवन विभागाच्या कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.