शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते हाच नगर मधील बेकायदेशीर बायोडिझेल विक्री प्रकरणाचा मास्टर माइंड.

पोलिस तपासात झाले निष्पन्न, अटकेसाठी पोलिस घरी जाण्यापूर्वी सातपुते फरार

नगर शहर परिसरासह जिल्ह्यात चालू असलेल्या बेकायदेशीर बायोडिझेल विक्री प्रकरणाचा मास्टरमाईंड शिवसेनेचा शहरप्रमुख दिलीप सातपुते असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली . पोलिसांनी आरोपी दिलीप सातपुतेच्या अटकेची कारवाई देखील सुरू केली आहे . याची कुणकुण लागताच सातपुते नगरमधून फरार झाला आहे .
 दि .२२ ऑक्टोबरला पुरवठा विभागासह कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपास चौक परिसरात छापा टाकून बेकायदेशीर बायोडिझेल विक्री प्रकरणी कारवाई केली होती .यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संपत शिंदे करत आहेत . बायोडिझेलप्रकरणात कोतवाली पोलिसांनी आत्तापर्यंत दहा जणांना अटक केली आहे . तसेच यात २२ नावे निष्पन्न झाली आहेत . जिल्ह्यात बायोडिझेलचा पुरवठा कोण. करतो आणि याचा जिल्ह्यातील मास्टरमाईंड कोण ? या अनुषंगाने कोतवाली पोलिस तपास करत होते . तपासात २२ नावे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून शिवसेनेचा शहरप्रमुख दिलीप सातपुतेचे नाव समोर आले . सातपुतेचे नाव समोर येताच तो फरार झाला आहे . दिलीप सातपुतेला अटक करण्यासाठी कोतवाली पोलिसांनी गुरुवारी ( दि .१८ ) मध्यरात्री त्याच्या केडगाव येथील घरी धाड टाकली . मात्र , सातपुते तेथे मिळून आला नाही . कोतवालीचे पो.नि. संपत शिंदे , पो.कॉ . योगेश भिंगारदिवे , दिपक रोहकले , हिवाळे, इंगळे यांच्यासह २ महिला पोलिस कर्मचारी यांच्या पथकाने त्याच्या घरी तपासणी केली . सातपुते घरी न सापडल्यामुळे पोलिसांनी तो शहरात कोठे लपून बसु शकतो , याची माहिती घेऊन संभाव्य ठिकाणीही त्याचा शोध घेतला . तेथे देखील तो मिळून आला नसल्याने सातपुते जिल्हा सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे . कोतवाली पोलिसांनी सातपुते घरी न सापडताच त्याच्या शोधार्थ तीन पथके रवाना करण्यात आली आहेत . या प्रकरणात शहरासह जिल्ह्यातील आणखी आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता असून पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत .