सम्यक क्रांती घडवून आणण्यासाठी कायदा, माहिती, तंत्रज्ञान आणि उन्नतचेतना राबविण्याचा आग्रह

सम्यक क्रांती घडवून आणण्यासाठी कायदा, माहिती आणि तंत्रज्ञान राबवून, उन्नतचेतना असलेले लोकप्रतिनिधी विधीमंडळ व संसदेत पाठविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद आग्रही असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
देशात सम्यक क्रांती घडवून आणण्यासाठी कायदा खर्‍या अर्थाने राबवला गेला पाहिजे. या देशातील गरिबी आणि बेकरी हटविण्यासाठी तसेच जातीयवाद संपवण्यासाठी आणि धर्माचा दूराभिमान बाळगणार्‍या धर्म अतिरेक्यांना धडा शिकवण्यासाठी कायद्याशिवाय पर्याय नाही. पाश्‍चात्त्य देशांची प्रगती फक्त माहिती तंत्रज्ञानामुळे होऊ शकली. त्यामुळे भारतात देखील माहिती तंत्रज्ञान घराघरात पोचले पाहिजे. विशेष म्हणजे उन्नतचेतनेशिवाय देशाची प्रगती होऊ शकणार नाही. त्यामुळे कायदा, माहितीगंगा, तंत्रज्ञान, उन्नतचेतना यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्याची गरज आहे. संसद किंवा विधीमंडळामध्ये जाणार्‍या प्रत्येकाला या चार गोष्टी मध्ये प्राविण्य असले पाहिजे. संघटनेने जय शिवाजी, जय डिच्चू कावा या तंत्राचा आग्रह धरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे आजच्या आधुनिक समाजासाठी कायद्याने स्थापन केलेले कायदे मंडळ, न्यायपालिका व कार्यकारी मंडळ या सर्वांना आदर्श ठेवणार्‍या गोष्टी होत्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे किमान पन्नास टक्के गुण असणार्‍यांना सार्वजनिक जीवनामध्ये वाव देण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात देश आणि देशातील जनतेबाबत उदासीनता निर्माण झाली. स्वतः, कुटुंब, नातेवाईक यांच्यासाठी सत्ताधार्‍यांनी शक्ती खर्च केली. त्यामुळे देशातील कोणत्याही शहरात किंवा ग्रामीण भागात रस्ते, पाणी, वीज या प्राथमिक गरजा पुर्ण करता आलेल्या नाहीत. झोपडपट्ट्या वाढत आहे. गरीबी आणि बेकरी व्यापक झाली असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श शासन प्रशासनात असल्यास देशात क्रांती होणार आहे. प्रत्येक मतदाता हा प्रजासत्ताकातील सर्वसत्ताधीश झालेला असताना, भाडभ्रष्ट, गुट्टलबाज, सत्ता पेंढारी मतदात्यांना गोल करून मागच्या दाराने सत्ता मिळत असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

भाडभ्रष्ट, गुट्टलबाज पुढार्‍यांना धडा शिकवण्यासाठी संघटनेने जय शिवाजी, जय डिच्चू कावा मोहिम हाती घेतली आहे. त्याचधर्तीवर सम्यक क्रांती घडवून आणण्यासाठी कायदा, माहिती आणि तंत्रज्ञान राबवून, उन्नतचेतनेचा आग्रह धरण्यात आला आहे. यासाठी अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, यमनाजी म्हस्के, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, अ‍ॅड. गवळी, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.