शिवसेनेच्यावतीने स्टेशन प्रबंधकांना निवेदन

नगर —  परळी-बीड-नगर- पुणे रेल्वे सेवा सुरु करण्यात यावी, या मागणीचे निवेदन शहर शिवसेनेच्यावतीने माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, दत्ता जाधव, दत्ता कावरे, योगीराज गाडे, गिरिष जाधव, अमोल येवले, प्रशांत गायकवाड, काका शेळके, संग्राम कोतकर, दिपक खैरे, परेश लोखंडे, जालिंदर वाघ,  सुरेश क्षीरसागर, अशोक दहिफळे, सुरेश तिवारी, गौरव ढोणे,  पप्पू भाले, प्रमोद ठुबे, आंबादास शिंदे, अरुण झेंडे, अरुणा गोयल  आदि उपस्थित होते.

स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे मंत्रालय लवकरच आष्टी-नगर अशी रेल्वे सुरु करणार असल्याचे समजते; वास्तविक ब्रिटीश काळापासून बीड जिल्हा रेल्वे सेवेपासून वंचितच राहिला. अखेर त्या जनतेला आपण न्याय आणि समाधान देण्यासाठी विकासाचे पाऊल उचलले आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन! पण ही रेल्वे परळी-बीड-नगर-पुणे अशी सुरु व्हायला हवी तरच बीडकर आणि नगरकरांचे भले होणार आहे. मराठवाडा व नगरमधील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी पुणे या ठिकाणी जात असल्यामुळे त्यांच्या  भवितव्यासाठी परळी-पुणे रेल्वे सेवा सुरु करणे गरजेचे आहे.

नगर आणि बीड जिल्ह्यात वाढते औद्योगिकरण न झाल्याने आणि साखर सम्राटांचे जिल्हे म्हणून नावारुपास आल्याने या जिल्ह्यात तरुणांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला नाही. तसेच उच्च शिक्षणाच्या सुविधा म्हणाव्या अशा झाल्या नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यातील तरुण वर्ग नोकरी व्यवसायानिमित्त पुणे आणि मुंबईकडे धावला. त्यामुळे या दोन शहराची नगर आणि बीडचे जवळकीचे नाते निर्माण झाले आहे. नगरपासून पुणे अवघे 120 किमी आणि आरि परळी ते पुणे अंतर 338 कि.मी. आहे. सध्या एस.टी.महामंडळाचा संप सुरु असल्याने खाजगी वाहनातून प्रवासाला दुप्पट खर्च करावाला लागत आहे.

आपल्या रेल्वे मंत्रालयाने मागील 3 वर्षापूर्वीच नगर-पुणे लोह मार्गाचे अंतर आणि वेळ कमी करण्यासाठी दौंड मार्गावर अलीकडे केडगाव पर्यंत कॉड लाईन टाकून या रस्त्यावरुन प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतुक सुरु देखील केली; पण नगर-पुणे शटल रेल्वे सुरु केली नाही. आता दोनच महिन्यापूर्वी आपण नगर-आष्टी रेल्व मार्गाचे काम पूर्ण केले आणि आता आपण या मार्गावरुन रेल्वे देखील सुरु करीत आहोत. पण ही रेल्वे परळी-बीड-नगर-पुणे अशी केल्यास त्याचा लाभ बीडकरांसह नगरकरांना देखील होईल व वाजवी दरात लोक प्रवास करु शकतील. नगर आणि बीडच्या विकासाला आणि प्रगतीला चालना देण्यासाठी ही रेल्वे सुरु होणे आवश्यक आहे तरी या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा.

ही रेल्वे सुरु न केल्यास शिवसेनेला रेल रोको आंदोलन करण्याचा मार्ग अवलंबावा लागेल, तरी आपण योग्य ती सकारात्मक कार्यवाही करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.