सीना नदी पात्रात प्रदूषणामुळे होणारा प्रचंड फेस नदीपात्रातून थेट रस्त्यावर

शिवसेना जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी आज सीना नदी पात्रात प्रदूषणामुळे होणारा फेस आणि हा प्रचंड फेस नदीपात्रातून थेट रस्त्यावर आल्यानंतर वाहनचालकांना होणारी अडचण आणि धोका फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करून पुढे आणला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ करतेय काय असा प्रश्नही कार्ले यांनी उपस्थित करत भविष्यातील पर्यावरणीय धोक्याची जाणीव करून दिली आहे.

संदेश कार्ले हे आज वाळकी हुन वाकडी कडे येत असताना वाटेत सीना नदी पात्रात त्यांना चक्क प्रदूषित पाण्यामुळे झालेले फेसांचे डोंगर दिसून आले. हा पांढराशुभ्र प्रचंड फेस अक्षरशः नदी पात्रात आणि त्याच बरोबर थेट नदीवरील पुलावर आल्याचे चित्र त्यांना दिसले. या भयावह परिस्थितीचे व्हिडीओ आणि फोटो कार्ले यांनी काढले.

या प्रसंगाची माहिती देताना संदेश कार्ले म्हणाले , की गेली अनेक वर्षे सीना नदी प्रदूषित आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ वारंवार कळवूनही ठोस कारवाई संबंधितांवर करत नाही. परिणामी पुराच्या पाण्याच्या धोक्यांपेक्षा आता हा प्रदूषणामुळे झालेला फेसांचा पूर जास्त भयावह झाला आहे. या फेसांचे थरचेथर रस्त्यावर येत आहेत. यातून वाहने चालवणे धोक्याचे आणि जीवाशी खेळणारे आहे. वाहनचालक कसेबसे येथून प्रवास करतात. अनेकदा याठिकाणी या फेसांच्या थरांमुळे अपघात होऊन अनेकजण जखमी झाले आहेत. नगर तालुक्यात आता संपूर्ण भूजल प्रदूषित होत आहे. ही परिस्थिती आता इतरत्रही दिसू लागली आहे. यात तातडीने उपाययोजना आणि अमलबाजवणी केली नाही तर भविष्यात पिण्यास पाणी मिळणार नाही अशी भीती संदेश कार्ले यांनी व्यक्त केली आहे.