सेवाप्रीतच्या उमंग फेस्टला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

महिलांच्या सक्षमीकरणासाठी व अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने बुरुडगाव रोड येथील अंकुर लॉनमध्ये भरविण्यात आलेल्या उमंग 2021 फेस्टचे उद्घाटन ज्येष्ठ महिला कवल गुलशनकुमार ओबेरॉय यांच्या हस्ते झाले. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, अर्चना खंडेलवाल, डॉ. सिमरन वधवा, गिता नय्यर, सविता चड्डा, सुशिला मोडक, अनू थापर, रितू वधवा, गिता माळवदे, निशा धुप्पड, स्विटी पंजाबी आदी उपस्थित होते.
फाऊंडेशनच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी महिला एकत्र येऊन सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून योगदान देत आहे. कोरोना महामारीत अनेकांचा रोजगार गेला, नोकर्‍या गेल्या तसेच विविध व्यवसाय करणार्‍या महिलांवर देखील आर्थिक संकट ओढवले. या परिस्थितीत महिलांना एक व्यासपिठ निर्माण करुन त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी सेवाप्रीतने उमंग 2021 फेस्टचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांनी महिलांसाठी भरविलेल्या उमंग फेस्टला शहरातील महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. महिलांना आपल्या व्यवसायाशी निगडीत खाद्य पदार्थ, हस्तकला, विविध साहित्य, वस्त्रांचे स्टॉल लावले होते. यावेळी महिलांसाठी विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. या फेस्टच्या माध्यमातून जमा झालेले पैसे अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी खर्च केले जाणार असल्याचे सेवाप्रीतच्या वतीने जाहीर करण्यात आले.