सैनिक समाज पार्टीच्या राज्य सरचिटणिसपदी अरुण खिची यांची निवड

सैनिक समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कर्नल बलबीरसिंह परमार व राज्य सचिव ईश्‍वर मोरे यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांच्या हस्ते खिची यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी सैनिक तुकाराम डफळ, माजी सुभेदार भाऊसाहेब आंधळे, माजी सैनिक शिवाजी पालवे, भाऊसाहेब दांगडे, बाळासाहेब भुजबळ, अ‍ॅड. स्वाती गायकवाड, राजेंद्र शिंदे, दिपक वर्मा, नयना चायल आदी उपस्थित होते.


अ‍ॅड. शिवाजी डमाळे म्हणाले की, लोकांनी लोकांसाठी बनवलेली लोकशाही यंत्रणा ही खरी यंत्रणा आहे. परंतु मधल्या काही वर्षापासून  प्रस्थापित घराणेशाहीतील पक्ष व पार्टीने स्वतःसाठी, नात्यागोत्यांच्या फायद्यासाठी यंत्रणेचा वापर सुरु केला आहे. पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळवणारी व्यवस्था निर्माण केली. अशा प्रस्थापित घराणेशाही विरोधात सैनिक समाज पार्टीने बंड पुकारले असून, सर्वसामान्य जनतेला एक पर्याय उपलब्ध करुन दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
नवनिर्वाचित राज्य सरचिटणीस अरुण खिची यांनी प्रस्थापित घराणेशाही ही लोकशाहीला लागलेली कीड आहे. यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्‍न सुटत नसून, भ्रष्टाचार वाढत आहे. आजही ब्रिटीश राजवटीतील कायदे प्रणाली राबवली जात आहे. इंग्रजांनी घातलेल्या त्रुटी रद्दबातल करुन लोकशाहीला नवसंजीवनी देण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे. सर्वसामान्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे. घराणेशाही, भ्रष्टाचार व मत खरेदी-विक्री या गोष्टी समाजातून हद्दपार करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर चारित्र्यवान लोकांना संघटेनेच्या माध्यमातून जोडले जाणार असल्याचे स्पष्ट करुन, नागरिकांमध्ये कायद्यांची जागृकता निर्माण करण्यासाठी विशेष मोहिम राबविणार असल्याचे सांगितले. या निवडीबद्दल खिची यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.