स्वच्छता व शैक्षणिक गुणवत्तेसाठी रयतच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेस आयएसओ मानांकन

शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेस स्वच्छता, टापटीपपणा व शैक्षणिक गुणवत्तेसाठी आयएसओ मानांकन मिळाले. बुरुडगाव रोड येथील रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग कार्यालयात आयएसओ मानांकन संस्थेचे लीड ऑडिटर अनिल येवले यांच्या हस्ते शाळेला आयएसओ मानांकन प्रदान करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग निरीक्षक टी.पी. कन्हेरकर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, लाइफ मेंबर एस.एल. ठुबे, शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके आदींसह प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे रेकॉर्ड, शालेय स्वच्छता, टापटीपपणा, शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेऊन कॉलिटी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये शाळेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांच्याकडे आयएसओचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन शाळेचा गौरव करण्यात आला.
आयएसओ मानांकन संस्थेचे लीड ऑडिटर अनिल येवले म्हणाले की, कोरोनानंतर तंत्रज्ञानाच्या शक्तीवर शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल झाला असून, त्याचा स्विकार शिक्षक व पालकांना करावा लागणार आहे. बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक असून, विद्यार्थ्यांना काळानुरुप शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी बदलाच्या दिशेने पाऊल टाकावे. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळा गुणवत्ता व स्वच्छतेच्या निकशात परिपुर्ण ठरल्याने त्यांना आयएसओचे मानांकन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर विभाग निरीक्षक टी.पी. कन्हेरकर यांनी सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्था कटिबध्द आहे. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण मिळण्यासाठी डिजीटल स्कूल, ई लर्निंग आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या नावाजलेल्या संस्थेच्या शाळेला आएसओ मानांकन मिळाल्याचे अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळा गुणवत्तेबाबत आघाडीवर आहे. शाळेमध्ये गुणवत्तेबरोबर स्वच्छतेला देखील महत्त्व देण्यात आले असून, निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्व शिक्षक योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेला मिळालेल्या आयएसओ मानांकनाबद्दल संस्थेचे विभागीय अध्यक्ष आमदार आशितोष काळे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अरुण पाटील कडू, बाळासाहेब बोठे, बाबासाहेब भोस यांनी शाळेचे अभिनंदन केले.