अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने घरपोच दारु विक्रीचा निर्णय मागे घेण्याची मागणी

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजन, बेड, रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नसताना, घेण्यात आलेला घरपोच दारु विक्रीचा निर्णय अत्यंत चुकीचा व घातक असल्याने हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

एकीकडे कोरोनाने अनेक रुग्ण मृत्यूमुखी पडत असताना, दुसरीकडे सरकार व्यसनाने सुखी संसाराची राखरांगोळी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. सदर निर्णय मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दारू व इतर व्यसनाने प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य आनखी धोक्यात येणार आहे. नागरिकांच्या जीवनासाठी आवश्यक असणार्‍या वैद्यकिय सुविधा पुरवण्यास सरकार असमर्थ ठरत असताना दारु विक्री करुन काय सिध्द होणार? हा प्रश्‍न संघटनेने उपस्थित केला आहे.

              कोरोना व टाळेबंदीमुळे अनेक चिंताग्रस्त व तणावाखाली वावरत आहे. तसेच अनेकांची आर्थिक परिस्थिती देखील नाजूक बनली आहे. अशा परिस्थितीमध्ये दारुविक्री केल्यास मोठ्या संख्येने युवक वर्ग व्यसनाच्या आहारी जाणार आहे. तर ज्येष्ठ व्यक्तींनी घरात बसून दारु पिल्यास त्याचा घरातील लहान मुलांवर विपरीत परिणाम होणार आहे. मागील टाळेबंदी दारु विक्री बंद केल्याने अनेकांची दारु सुटल्याचे उदाहरण आहेत.

दारुने घरातील भांडण तंटे वाढून अनेकांचे संसार उध्वस्त होणार असल्याचे निवेदनात म्हंटले अहे. तसेच व्यसनाने सुखी संसाराची राखरांगोळी करण्यासाठी घेण्यात आलेला निर्णय घातक आहे. गरीब हातगाडीवाले छोटे विक्रेते हे उपाशी मरत असताना त्यांना कोरोनाच्या नावाखाली दुकाने बंद ठेवायला लावणार आणि दुसरीकडे श्रीमंत दारुवाल्यांना पैसे कमवायला परवानगी देणार, हा भेदभाव संतापजनक असल्याची भूमिका अरुण रोडे यांनी व्यक्त करुन घरपोच दारु विक्रीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, राज्यपाल व मुख्यसचिव यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहे.