अहमदनगर जिल्हा घरेलू मोलकरीण संघटनेच्या जिल्हा मेळाव्यात मोलकरीणींच्या विविध प्रश्‍नावर चर्चा

घरेलू मोलकरणींच्या भविष्य व जीवन मरणाच्या प्रश्‍नासाठी संघर्ष

घरेलू मोलकरीण कामगारांच्या अनेक जिव्हाळ्याचे प्रश्‍न प्रलंबीत आहे. त्यांच्या भविष्याचा व जीवन मरणाच्या प्रश्‍नासाठी त्यांचा संघर्ष आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये वार्‍यावर सोडणार नाही. शासनाने त्यांच्या   प्रश्‍नाची दखल घ्यावी, अन्यथा महाराष्ट्रातील मोलकरीण रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी आंदोलन करतील, असा  इशारा राष्ट्रीय मोलकरीण संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ. बबली रावत यांनी दिला. तर वयाच्या साठ वर्षानंतर त्यांना पेन्शन सुरू करण्याची मागणी देखील केली.
 अहमदनगर जिल्हा घरेलू मोलकरीण संघटनेचा जिल्हा मेळावा व वार्षिक बैठकीत मार्गदर्शन करताना कॉ. रावत बोलत होत्या. राहता येथील संत सेना महाराज मंदिरात लताताई डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली .

या बैठकीसाठी कॉ. एल.एम. डांगे, महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक व आरोग्य संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले, आयटकचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ. अ‍ॅड. सुधीर टोकेकर, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे कॉ. मारुती सावंत, बिडी कामगार फेडरेशनचे कॉ. निवृत्ती दातीर, आयटेकचे राज्य सदस्य कॉ. सुरेश पानसरे, अवतार मेहेरबाबा ट्रस्ट युनियनचे कॉ. सतिश पवार, कॉ. घरेलू मोलकरीण कामगार नेत्या लीला तस्कर, बिडी फेडरेशनच्या उपाध्यक्ष कॉ. भारती न्यालपेल्ली आदी उपस्थित होत्या.
पुढे कॉ. रावत म्हणाल्या की, कोरोना काळात घरेलू मोलकरीणींना प्रचंड त्रास सहन करावा लागला. टाळेबंदीत त्यांचा रोजगार हिरावल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अशा परिस्थितीमध्ये संघटनेने शासनाकडे पाठपुरावा करुन त्यांना 10 हजार रुपयाचे अनुदान मिळवून दिले. भविष्यातही ही संघटना मोलकरीण कामगारांच्या न्याय, हक्कासाठी लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात लताताई डांगे यांनी मोलकरीण संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी राज्यकारणी सदस्य कॉ. जयश्री गुरव, कॉ. उषा अडागळे, कॉ. सविता धापटकर यांनी संघटनेच्या माध्यमातून न्याय, हक्क पदरात पडत असल्याची भावना व्यक्त करुन, संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला.
 कॉ. राजू देसले यांनी आशा व गट प्रवर्तक यांच्या मानधन वाढीसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीची सविस्तर माहीती दिली. मोलकरीन संघटनेच्या राज्य अध्यक्ष कॉ. सुशिला यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कॉ. सुरेश पानसरे यांच्या नियोजनाखाली झालेल्या या बैठकीच्या यशस्वीतेसाठी विनायक तुपे, कॉ. उज्वला तुपे, मिनाक्षी तुपे, नंदा भारस्कर, मिराबाई तुपे, कॉ. सुनिता तुपे, आशा संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष कॉ. सविता धापटकर, जिल्हा कौन्सिल सदस्या कॉ. अश्‍विनी गोसावी, वर्षा चव्हाण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. बाबा शेख यांनी केले. आभार अ‍ॅड.कॉ. सुधिर टोकेकर यांनी मानले.