कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी उषा राऊत तर उपनगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची बिनविरोध निवड
कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सौ उषा अक्षय राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सौ रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी जाहीर केली.
कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी बुधवार, दि १६ रोजी सकाळी ११ वाजता पीठासीन अधिकारी डॉ थोरबोले यांनी लोकनियुक्त सर्व नगरसेवकांची बैठक घेत कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष म्हणून उषा राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची निवड जाहीर करताच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी जल्लोष केला. यावेळी सर्व नुतन पदाधिकार्याची शहरातुन मिरवणूक काढत संत सदगुरु गोदड महाराज यांच्या मंदिरात जात दर्शन घेतले. कर्जतकरांच्या मनातील स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याची ग्वाही उषा राऊत आणि रोहिणी घुले यांनी दिली.
याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, माजी नागराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नामदेवराव राऊत, गटनेते संतोष म्हेत्रे, सचिन घुले, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या.