केडगावला 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

शिवकालीन युद्धकलेचे रंगले थरारक प्रात्यक्षिक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने केडगाव विभागामार्फत 350 वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री शिवछत्रपतींचा सकाळी वैदिक पद्धतीने महाअभिषेक व महाआरती भारतीय सेनेत सेवा करणार्‍या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आली.
या कार्यक्रमात बालगोपाळांनी विविध शिवकालीन वेशभू्षा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी जामखेडच्या श्री शंभू सूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्धकलेचे थरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. यामध्ये लाठी-काठी, भाला, ढाल, तलवारबाजी लढत, दांडपट्टा, पाशचक्र आदी शिवकालीन शस्त्रांचे प्रात्यक्षिक रंगले होते.विशेषत: या मर्दानी खेळात मुलींचा उत्स्फूर्त सहभाग होता. सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येक घरातील मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले पाहिजे आणि येणार्‍या काळात सर्व मुलींना निर्भय व सक्षम बनविण्याचा संदेश या मर्दानी खेळाच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व केडगाव येथील विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.