कोविड लसीकरणाच्या सक्तीविरोधात 20 डिसेंबरला बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन

आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्यात कोविड लसीकरणाची सक्ती केली जात आहे. या कोविड लसीकरणाच्या सक्ती विरोधात सोमवार दि. 20 डिसेंबर रोजी बहुजन मुक्ती पार्टीने आंदोलनाचे हत्यार उपसले असून, राज्यातील 36 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनाची नोटीस जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष समीर शिंदे, जिल्हा प्रभारी राजेंद्र करंदीकर, शहराध्यक्ष शिवाजी भोसले, प्रदेश कार्याध्यक्ष संजय सावंत, पारनेर तालुकाध्यक्ष अय्युब शेख, महिला आघाडी अध्यक्षा अ‍ॅड.मोनिकाताई सोनवणे, बहुजन क्रांती मोर्चाचे गणेश चव्हाण, डॉ.भास्कर रणनवरे, नगर तालुकाध्यक्ष सुधीर खरात, अक्षय जाधव, कन्हैया इट्टम, अविनाश देशमुख, नाना वाळुंज आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयास कोविड लसीची सक्ती करता येणार नसल्याचे अ‍ॅफीड्यूट लिहून दिले आहे. तसेच मणीपूर, कर्नाटक, गुजरात, राजस्थान येथील उच्च न्यायालयाने लसीची सक्ती केली जाऊ शकत नाही असा निकाल दिला आहे. सक्ती करणे म्हणजे संविधान कलम क्र.14, 19 व 21 चे उल्लंघन असल्याचे निकालात म्हंटले आहे. तरी महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अन्य विभागांना पत्र पाठवून लसीची सक्ती करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. नागरिक, कर्मचारी, कामगार, मजूरांना लस घेणे सक्ती केली जात आहे. त्याचबरोबर शासकीय मूलभूत योजना देण्याचे बंद करण्यात आले आहे. प्रवास करणे, शाळा-महाविद्यालात येणे, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश व प्रशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने एक दिवसीय राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने केली जाणार असल्याचे नोटीसमध्ये म्हंटले आहे.
सोमवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 3 वाजे पर्यंत हे आंदोलन चालणार असून, आंदोलनात सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी केले आहे. कोविड लसीकरणाच्या सक्तीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीने आवाज उठवला असून, या आंदोलनात छत्रपती क्रांती सेना, बहुजन क्रांती मोर्चा, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन, भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बुधिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा आदी संघटना सहभागी होणार आहेत.