कोविड लसीकरण सक्तीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे धरणे

महाराष्ट्र राज्यासह जिल्ह्यात कोविड लसीकरणाची सक्ती केली जात असल्याच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सक्तीच्या लसीकरण विरोधात जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात जिल्हा प्रभारी राजेंद्र करंदीकर, प्रदेश कार्याध्यक्ष संजय सावंत, मौलाना खलिलूरहेमान नदवी, बाळासाहेब पातारे, पारनेर तालुकाध्यक्ष अय्युब शेख, बहुजन क्रांती मोर्चाचे गणेश चव्हाण, डॉ.भास्कर रणनवरे, डॉ. रमेश गायकवाड, फिरोज शेख, नगर तालुकाध्यक्ष सुधीर खरात, अविनाश देशमुख, मुफ्ती अल्ताफ, हर्षद रुपवते, राहुल तुपविहीरे, राजू साळुंके, दादा शिंदे, विजय सोनवणे, मौलाना जुबेर सय्यद आदी सहभागी झाले होते.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयास कोविड लसीची सक्ती करता येणार नसल्याचे अ‍ॅफीड्यूट लिहून दिले असताना देखील अनेक राज्यांमध्ये कोविड लसीकरणाची सक्ती केली जात आहे. लस न घेणार्‍यांना जीवनावश्यक वस्तूंवर देखील निर्बंध आनण्याचे पाऊले राज्य सरकार उचलीत असून, या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आवाज उठविण्यात आला असून, राज्यातील 36 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व ठिकठिकाणी सोमवारी (दि.20 डिसेंबर) आंदोलन करण्यात आले.
कोरोना लसीकरणाची सक्ती करणे म्हणजे संविधान कलम क्र.14, 19 व 21 चे उल्लंघन असून, त्यांच्या हक्कावर गदा येत आहे. जिल्ह्यात देखील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना लसीकरण न केलेल्या नागरिकांना सोयी-सुविधा बंद करण्याची घोषणा केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अन्य विभागांना पत्र पाठवून लसीची सक्ती करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. नागरिक, कर्मचारी, कामगार, मजूरांना लस घेणे सक्ती केली जात आहे. त्याचबरोबर शासकीय मूलभूत योजना देण्याचे बंद करण्यात आले आहे. प्रवास करणे, शाळा-महाविद्यालात येणे, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश व प्रशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आल्याने या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीने तीन तास ठिय्या आंदोलन केले. सरकार कोरोना लस पुरविणार्‍या कंपन्यांचे हित साधण्यासाठी नागरिकांवर निर्बंध आनत आहे. कोरोनावर प्रभावी असलेली लस नव-नवीन व्हेरियंट आल्यावर त्यावर प्रभावी आहे की नाही?, लस मध्ये कोणत्या गुणधर्माचे औषध आहे व त्याचे दुष्परिणाम काय? या प्रश्‍नांवर लस उत्पादक कंपनी व आरोग्य यंत्रणा देखील बोलण्यास तयार नसल्याचे आंदोलकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बंगळुरू जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झालेल्या घटनेचा देखील यावेळी निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात छत्रपती क्रांती सेना, बहुजन क्रांती मोर्चा, सोशल हेल्थ मुव्हमेंट, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन, भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बुधिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.