जागा खाली करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने सुपारी दिल्याचा व यामध्ये दोन अधिकारी सहभागी असल्याचा आरोप

त्या बांधकाम व्यावसायिकाच्या काळ्या पैश्याचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करावा

पाईपलाईन रोड, समर्थ नगर येथील एका खासगी जागा खाली करण्यासाठी शहरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाने एका गुंड प्रवृत्तीच्या महिलेला सुपारी दिली असून, बांधकाम व्यावसायिकाने तब्बल 15 कोटीचा ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी दोन अधिकारी हाताशी धरले असल्याचा आरोप करुन सदर प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्याची मागणी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. तसेच या प्रकरण उघडकीस आनल्याप्रकरणी जीवितास धोका निर्माण झाले असल्याने पोलिस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी आरपीआयचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष अजिम खान, तालुका युवक कार्याध्यक्ष संदीप वाघमारे आदी उपस्थित होते.
पाईपलाईन रोड, समर्थ नगर येथील जागेचा व्यवहार एका नामांकित बांधकाम व्यावसायिक व गुंड प्रवृत्तीची महिला आणि त्याच्या साथीदारासह झाला. व्यवहार झाल्यानंतर जागा खाली करण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या महिलेच्या नावे बांधकाम व्यावसायिकाने नोटरी साठेखत करुन दिली. सदर जागा खाली करण्यासाठी एकप्रकारे सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात सुपारी देणारे भूमी अभिलेख  कार्यालयातील दोन मोठे अधिकारी मध्यस्थी आहे. बांधकाम व्यावसायिकाने 15 कोटी रुपयाचा ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी सदर अधिकारी हाताशी धरण्यात आले. त्यांनी सदर बांधकाम व्यावसायिकाकडे सुपारी घेणार्‍यांना घेऊन गेले. जागा खाली करण्यासाठी त्यांना 25 लाख रुपये देण्यात आले असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरपीआयने आवाज उठविल्यानंतर काही दिवसानंतर सुपारी घेणार्‍यांचे पितळ उघडे पडले. सर्व सत्य परिस्थिती लोकांच्या समोर आली. सुपारी घेणारे एका गुंडावर तडीपारचा प्रस्ताव असून, त्याला नोटीस आली असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्यात आपापसात वाद सुरू झाले. या प्रकरणात हस्तक्षेप करुन सत्य समोर आनल्यामुळे सबंधित व्यक्तींकडून जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या सर्व प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखे मार्फत करण्यात यावा, मध्यस्थी करणारे दोन अधिकारी कोण? याचा देखील तपास करावा, बांधकाम व्यावसायिकाने एवढा मोठा काळा पैसा आनला कोठून याचा तपास करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास 31 डिसेंबर पासून पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा भिंगारदिवे यांनी दिला आहे.