जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर व अजय फाऊंडेशनच्या वतीने थंडीत गारठलेल्या गरजू घटकांना ब्लँकेटचे वाटप
जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर व अजय फाऊंडेशनच्या वतीने थंडीत रस्त्याच्या कडेला गारठलेल्या गरजू घटकांना ऊबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. जायंट्स इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक कै. नाना चुडासामा यांच्या स्मृतीदिनानिमित्त व नाताळ सणाचे औचित्यसाधून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. थंडीत अनपेक्षितपणे मिळालेली अनोखी भेट पाहून अनेक गरजूंच्या चेहर्यावर आनंद फुलले.
दिल्लीगेट येथील शनी मंदिर समोर बसलेल्या गरजूंना ब्लँकेटचे वाटप करुन या अभियानाची सुरुवात करण्यात आली. रात्री कडाक्याच्या थंडीत गरजूंसाठी ब्लँकेट वाटप सुरु होते. श्री विशाल गणपती, नगर-पुणे महामार्गावर वास्तव्यास असलेले कामगार व रस्त्यावर जीवन जगणार्यांना या ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी जायंट्स वेलफेअर फाऊंडेशनचे सदस्य संजय गुगळे, जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षा विद्या तन्वर, माजी अध्यक्षा नुतन गुगळे, अनिल गांधी, अभय मुथा, दीपक मुथा, डॉ. विनय शहा, संदीप सापा, यश कुमार, पृथ्वी कुमार, जालिंदर बोरुडे आदी उपस्थित होते.
संजय गुगळे म्हणाले की, जायंट्स ग्रुप व अजय फाऊंडेशन अनेक वर्षापासून सामाजिक भावनेने शहरात योगदान देत आहे. ग्रुपच्या माध्यमातून गरजूंना आधार देण्याचे कार्य सुरु आहे. रस्त्यावरील दुर्बल वंचित घटक हे समाजाचा एक घटक असून, थंडीनिमित्त त्यांना मायेची ऊब देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.