जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी…..
अहमदनगर : मेट्रो न्यूज
जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी -निमसरकारी, शिक्षक – शिक्षकेतर, महापालिका, नगरपालिका,नगरपरिषदा , नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने मंगळवार (दि.14 मार्च) पासून बेमुदत संपाला सुरुवात झाली आहे. या संपाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार संघटनेच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आला आहे. भाकपचे जिल्हा सहसचिव व आयटकचे राज्य उपाध्यक्ष अॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या समन्वय समिती व जिल्हा परिषद येथे झालेल्या कर्मचार्यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवून पक्षाचा व संघटनेचा पाठिंबा दिला.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये जुनी पेन्शन 2005 च्या दरम्यान बंद झाली होती. त्यानंतर ही पेन्शन सरकारी कर्मचार्यांना मिळणे बंद झाली. राज्य सरकार कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने ही पेन्शन योजना लागू करावी म्हणून अनेक निवेदन दिले, अनेक मोर्चे काढले. परंतु ही जुनी पेन्शन योजना सुरू झाली नाही. राज्य सरकारने यापूर्वी जुनी पेन्शन बाबत विचार करण्याचे आश्वासन दिले होते.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, परंतु अनेक सरकार येऊन गेले तरीदेखील जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही. देशातील चार राज्यांमध्ये सदर पेन्शन योजना लागू झालेली आहे. राज्य सरकारने पुढाकार घेऊन जुनी पेन्शनची मागणी मान्य करावी व कर्मचारी आणि शिक्षकांचा संप मिटवावा असे कर्मचार्यांच्या वतीने सांगण्यात आले.