जुनी पेन्शन सांपाला “आमदार संग्राम जगताप” यांचा जाहीर पाठिंबा
सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी आपली एकजुट कायम ठेऊन लढा यशस्वी करण्याचे आवाहन
जुनी पेन्शन संपाच्या पाचव्या दिवशी शनिवारी (दि.18 मार्च) न्यु आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांनी या आंदोलनात सहभागी होऊन संपाला जाहीर पाठिंबा दिला.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कर्मचार्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचलेल्या आहेत. मात्र अद्याप पर्यंत सरकारने हा विषय सकारात्मकपणे चर्चेला घेतलेला नाही. शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवलेले नाही. सरकारने सकारात्मक पाऊल टाकले नसल्याने लोकशाही मार्गाने शिक्षक व कर्मचार्यांचे जुनी पेन्शनसाठी बेमुदत संप सुरू आहे. सरकारने आंदोलकांच्या तीव्र भावनांचा विचार करावा. काही राजकीय मंडळी प्रमुख विषयापासून मन भरकटविण्यासाठी इतर मुद्दे उपस्थित करुन आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. मात्र सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी आपली एकजुट कायम ठेऊन लढा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
पोतराजच्या वेशभूषेत शिक्षकाने डोक्यावर जुनी पेन्शन मागणीची टोपी परिधान करुन सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी शिक्षक आंदोलकांनी जुनी पेन्शनसाठी जोरदार घोषणाबाजी केली. तर महिला शिक्षिकाही हालगी वाजवून आंदोलनात सहभाग नोंदविला.
या आंदोलनात जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे, सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अनंत गारदे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिरिष टेकाडे, खाजगी प्राथमिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उरूमुडे, प्रा. राजेंद्र जाधव, शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव संतोष कानडे, भाऊसाहेब कचरे, कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी अॅड. कॉ. सुभाष लांडे, धनंजय म्हस्के, शेखर उंडे, श्रीराम खाडे, प्रशांत म्हस्के, राजेंद्र कोतकर, भारत पाटील दळवी, आप्पसाहेब जगताप, घनश्याम सानप, योगेश गुंड आदींसह शिक्षक व महिला शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.