ज्ञान आत्मसात करण्यासाठी वय नसते -बाबासाहेब बोडखे

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ संचलित शालेय व्यवस्थापन पदविका (डि.एस.एम.) परीक्षेत शिक्षक परिषदेचे नेते तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी 94.13 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा डॉ. एन.जे. पाऊलबुध्दे शिक्षण शास्त्र महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ. रेखाराणी खुराणा, प्राचार्य भरत बिडवे, प्रा. शंकर सानप, प्रा. अमृता रत्नपारखी, प्रा. अनिता गायकवाड, प्रा. अर्पणा केसकर, प्रा. स्मिता चासकर, प्रा. मृदुला गोरे, प्रा. सविता सानप, प्रा. विनायक मच्चा, प्रा. प्रफुल्ल आमले, मोहन येमुल, प्रा. संदीप कांबळे आदी उपस्थित होते.
डॉ. एन.जे. पाऊलबुध्दे शिक्षण शास्त्र महाविद्यालयाला शिक्षकांसाठी डि.एस.एम. अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली असून, 2020-21 ची पहिली बॅचचा नुकताच निकाल लागला. पहिल्या बॅचचा निकाल शंभर टक्के लागला आहे. डी.एस.एम. अभ्यासक्रम हा एक वर्षाचा असून, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक होण्यासाठी शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही परीक्षा मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि पदवीधर शिक्षक देऊ शकतात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अध्ययन व परीक्षा प्रक्रिया ऑनलाईन झाल्याची माहिती प्राचार्या डॉ. रेखाराणी खुराणा यांनी दिली.
शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे म्हणाले की, बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक असून, विद्यार्थ्यांना काळानुरुप शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी बदलाच्या दिशेने पाऊल टाकावे. नव-नवीन अभ्यासक्रम, परीक्षा, चर्चासत्रे आदी ज्ञान प्रगल्भ होण्यासाठी उपयुक्त आहेत. ज्ञान आत्मसात करण्यासाठी वय नसते. प्रत्येक व्यक्ती शेवट पर्यंत विद्यार्थी असतो. तो नव-नवीन ज्ञान आत्मसात करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मार्गदर्शन करणार्‍या सर्व अध्यापकांचे त्यांनी पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार केला. शैक्षणिक संस्थेचे विनय पाऊलबुध्दे, महाविद्यालयाचे प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी यश संपादन करणार्‍या शिक्षकांचे अभिनंदन केले.