दिव्यांग व्यक्तीच्या संघर्षाने ग्रामस्थांचा बंद रस्ता झाला खुला

दिव्यांग व्यक्तीच्या पाठपुराव्याने प्रशासनाने दखल घेऊन तीन गावांना जोडणारा रस्ता खुला केला असून, ग्रामस्थांसह शेतकर्‍यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. आठ महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला होण्यासाठी गावातील दिव्यांग व्यक्ती पोपट केरु शेळके यांनी आवाज उठवला होता. तर रस्ता खुला करण्याचे प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन उपोषणाचा इशारा दिला होता. सदर रस्ता खुला झाल्याने शेळके यांनी उपोषण स्थगित केले.
मौजे रूपेवाडी (शंकरवाडी) (ता. पाथर्डी) गावातील गाव नकाशाप्रमाणे पारंपरिक असणारा दक्षिण-उत्तर रस्ता मोहिते कुटुंबियांनी बंद केला होता. गावातील बंद असलेला दक्षिण-उत्तर रस्ता घोडेगाव मिरी मुख्य रस्त्याला जोडणारा आहे. उत्तरेकडील लोहारवाडी व चांदा या गावांना जोडणारा हा रस्ता असल्याने उत्तरेकडील ग्रामस्थांची गैरसोय होत होती. शेती माल बाजारात घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्याने मोठे नुकसान होत आहे. तर शारीरिक दृष्ट्या अपंग असल्याने घरी जाण्यासाठी हेळसांड होत असताना दिव्यांग व्यक्ती पोपट केरु शेळके यांनी रस्ता खुला होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तर जनता दरबारमध्ये राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे रस्त्या खुला करुन देण्याची मागणीही केली होती. तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे व प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी यांनी तहसील कार्यालय व पंचायत समितीत संपर्क करून सदर रस्ता खुला करून देण्याची विनंती केली.
सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आखेर यश आले. नुकतेच सहाय्यक गटविकास अधिकारी दादासाहेब शेळके, ग्रामसेवक शिरीष उगार, सरपंच अशोकराव दहातोंडे आणि ग्रामपंचायत कर्मचारी अशोक मिरपगार यांनी रस्ता अडविणारे मोहिते कुटुंबीयांची मिळकत क्रमांक 59 ची मोजणी करून त्यांची हद्द निश्‍चित करून दिली. त्यानंतर बाबासाहेब मोहिते यांनी गैरसमजुतीने रस्ता बंद करण्यात आला होता. यानंतर सदर रस्त्यावर कोणताही अधिकार राहणार नसून, यापुढे हा रस्ता बंद करणार नसल्याचे ग्रामपंचायतला स्टॅम्पवर लिहून दिले. सरपंच दहातोंडे यांनी सदर रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला. रस्ता खुला झाल्याने उत्तरेकडील लोहारवाडी, चांदा व रुपेवाडी गावातील ग्रामस्थांचा दळणवळणचा प्रश्‍न कायमचा मार्गी लागला आहे. बंद केलेला रस्ता ग्रामस्थांसाठी खुला करुन देण्यात आला. यावेळी लोहारवाडीचे पोलिस पाटील विठ्ठल चांगुलपाई, लोहारवाडी सोसायटीचे चेअरमन पोपट शेकडे, रावसाहेब मोहिते, पोपटराव जाधव, संजय मोहिते, बाबासाहेब शेळके, अशोक शेळके, बाळासाहेब घुले, आदिनाथ शेळके, राम आठरे, बाळासाहेब चोभारे, शिवाजी गवळी, राजेंद्र मीठे, रेवन्नाथ मरकड, दिलीप शेळके, शिवाजी शेळके, सुधाकर शेळके, नवनाथ आठरे, गोरख चांगुलपाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते.