दादासाहेब जगताप यांचा लग्नाचे वळू चित्रपटाच्या चित्रिकरणाचा सावेडीत शुभारंभ

सध्या झी मराठी चॅनेलवर लोकप्रिय असलेल्या चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे व चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांच्या सुंदर अभिनयाने नटलेला विनोदी मराठी चित्रपट लग्नाचे वळू या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा शुभारंभ शहरातील सावेडीमध्ये नुकताच संपन्न झाला. निर्माते दादासाहेब जगताप यांची ही धमाल निर्मिती असून विजय सरोदे व उद्योजक सुहास बाठे यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे. सन इंडिया फिल्म्स मार्फत हा चित्रपट तयार होत आहे, अशी माहिती निर्माते दादासाहेब जगताप यांनी दिली.
लग्नाचे वळूफ चित्रिकरणाच्या शुभारंभ प्रसंगी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक सुनीलमामा कोतकर, साकतचे सरपंच राजेश चितळकर, रामायणाचार्य गोरखमहाराज दुतारे, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, उपमहाराष्ट्र केसरी अनिल गुंजाळ, पैलवान बंटी भाऊ गुंजाळ, न्हावरा येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक आबासाहेब मैड, पुणे येथील उद्योजक संजय भोसले, सनी सरोदे आदींसह कलाकार उपस्थित होते.


समाजात सध्या चालू असलेल्या परिस्थितीवर, लग्न जमविण्याच्या पारंपरिक पद्धतीवर व नवरदेव-नवरी निवडीच्या हट्टापायी संबंधित कुटुंबाची होणारी घुसमट व अडथळा, होणारा त्रास, मुला-मुलींचे कॉलेज जीवनातील प्रसंग, मुला-मुलींच्या आवडी-निवडीमुळे होणारा विलंब प्रचंड समाजविघातक ठरत आहे. या ज्वलंत प्रश्‍नावर होणार्या विविध सामाजिक अडथळ्यांवर तसेच लग्नाच्या तरुण मुला-मुलींचे होणारे हाल व सामाजिक अडचण या चित्रपटातून धमाल विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे. या वृत्तीस आळा बसण्यासाठी एक पूर्ण विनोदाने भरलेली कलाकृती लग्नाचे वळू या नावाने सादर होत आहे, असे निर्माते जगताप यांनी सांगितले.
विवाहाच्या प्रचंड समस्येवर दिलखुलासपणे विवेचन करून धमाल विनोदी शैलीत संपूर्ण चित्रपट मांडला आहे. यामध्ये विनोदवीर भारत गणेशपुरे यांनी मुलींना पटविणार्या विचित्र मुलांना वठणीवर आणण्यासाठी हवालदाराच्या भूमिकेत रंगत आणली आहे. तसेच बिनधास्त असलेल्या मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत असलेले विजय पाटकर हे मुलींवर आंधळे प्रेम करणार्या तरुणांकडून विविध कामांसाठी सेवा करून घेत. विजय पाटकर यांनी हास्याची धमाल करणारी भूमिका केली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या नायिकेची भूमिका करणारी प्रसिद्ध अभिनेत्री अंजली ज्वेल यांनी तीन तरुणांबरोबर व एका वयस्कर शेजार्याबरोबर बेमालूमपणे एकमेकांवर प्रेम करण्याची भूमिका निभावली आहे.


भारत गणेशपुरे व विजय पाटकर यांच्याशिवाय अंजली ज्वेल यांनी या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. असिस्टंट डायरेक्टर सुधाकर अवघडे यांनी मोहनरावांची सुंदर भूमिका केली आहे. जोशीच्या भूमिकेत काकासाहेब शिरोळे यांनी धमाल विनोद उडवून दिला आहे. असिस्टंट डायरेक्टर म्हणून तुषार नन्नवरे (सर) यांनी काम पाहिले आहे. तरुणांच्या भूमिकेत अमोल टापरे व पवन चौरे तसेच राजेश नन्नवरे यांनी काम केले आहे. विशेष भूमिकेत स्नेहा एटणे यांनी काम केले आहे. के. नुपूर, मुस्कान शेख, मायबोली चॅनेलवर गाजणारी रोहिणी केंद्रे यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत. रंगभूषा व वेशभूषा गौरी सामंत यांनी सांभाळली आहे. सतीश तांबे यांनी व्यवस्थापनाचीजबाबदारी सांभाळली आहे. राजू सावरे, विलास बोरकर, मोहन काळे, दत्ता पाटील व कुलदीप चव्हाण, पाहुणी कलाकार स्वाती धनवटे, सागर जाधव, मनोज पवार आदींनी लग्नाचे वळू मध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.