पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट पुन्हा सुरु

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दोन वर्षानंतर शाळा प्रत्यक्षरित्या सुरु झाल्याने पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट पुन्हा सुरु झाला. पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्यात आले असून, विद्यार्थ्यांची उत्स्फुर्त हजेरी होती. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा व वर्गाची सजावट करण्यात आली होती. तर मधुर संगीत व प्रफुल्लित वातावरणात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या वतीने कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी सर्व नियमांचे पालन करुन वर्ग भरविण्यात येत आहे.


कोरोना विषाणूंचा संसर्ग सुरु झाल्यानंतर महाराष्ट्रात शाळा बंद करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्या जसजशी कमी होऊ लागली त्याप्रमाणं शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. पण मध्यंतरी रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याने शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या होत्या. आता शासनाने पहिली ते सातवीचेही वर्ग सुरु करण्याची परवानगी दिल्यामुळे येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नियमित इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरु झाली आहे.
शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करून वर्ग भरवले जात आहे. विद्यार्थी, शिक्षक व सर्व कर्मचारी यांची शाळेच्या प्रवेश द्वाराजवळ पूर्ण तपासणी करण्यात आली. सर्व प्रथम टेम्प्रेचर, ऑक्सिजन लेव्हल तपासणी करून, तोंडाला मास्क सक्तीचे करुन मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मुलांच्या स्वागतासाठी शाळा, शाळेतील शिक्षक व कर्मचारी सज्ज होते. विद्यार्थ्यांचे थाटामाटात स्वागत करण्यासाठी शाळेच्या परिसरात वर्गात सुंदर सजावट करण्यात आली होती. प्रवेश द्वाराजवळ सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गाची फीत कापून प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मधुर संगीताने शाळेच्या परिसरात प्रसन्न वातावरण झाले होते. सर्व विद्यार्थी व्यवस्थित सुरक्षित अंतर ठेवून आपापल्या वर्गात बसले. तब्बल दोन वर्षानंतर शाळेला आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरील आनंद काही वेगळाच होता.


नेहमीप्रमाणे प्रार्थना, राष्ट्रगीत होऊन वर्ग भरल्याने शाळेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मंगेश जगताप यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.  शाळेत नियमांचे पालन कसे करायचे व शाळा, शाळेतील सर्व शिक्षक मुलांची काळजी कशी घेतली जाईल? याबाबत सांगितले. सर्व शिक्षकांनी मास्क वापरून विद्यार्थ्यांना  शिकवायला सुरवात केली.