निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले

नगर – – कोविड १ ९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या निर्बंधांची  काटेकोरपणे अंमलबजावणी करावी , असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ . राजेंद्र भोसले यांनी संबंधित यंत्रणाना दिले आहेत . कोविडची वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ . भोसले यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला . डॉ . भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक पार पडली . बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर , महापालिका आयुक्त शंकर गोरे , जिल्हा शल्यचिकित्सक , डॉ . भूषणकुमार रामटेके , महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते . सर्व उपविभागीय अधिकारी , सर्व गटविकास अधिकारी तहसीलदार , तालुका आरोग्य अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते . जिल्हाधिकारी डॉ . भोसले यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा , आरोग्य यंत्रणा यांच्या कामकाजाची माहिती घेऊन तालुक्यांतील लसीकरणाचे प्रमाण आणि कोविड चाचणीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना दिल्या . राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनातर्फे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी लागू केलेल्या आदेशाप्रमाणे सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवून जे कोणी निर्बंधांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी . कार्यालयांमध्ये पूर्वपरवानगी शिवाय अभ्यागतांनी येऊ नये , असेही त्यांनी नमूद केले .