पैशाचे आमिष दाखवून आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

संगमनेर : आठ वर्षीय अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६३ वर्षीय व्यक्तीला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली . येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र . न्यायालयाचे न्यायाधीश आर . आर . कदम यांनी गुरुवारी ( दि . १३ ) हा निकाल दिला . महादू कृष्णा ढेरंगे ( वय ६३ , रा . आंबी दुमाला , ता . संगमनेर ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे . २०१८ साली त्याने आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले होते . ही मुलगी आई – वडील आणि भावासमवेत तालुक्याच्या पठार भागातील एका गावात राहात असताना संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी येत होती . त्यावेळी ढेरंगे याने तिला शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते . हा प्रकार एका स्थानिक व्यक्तीने पाहिला . याबाबत त्या व्यक्तीने मुलीच्या वडिलांना सांगितले . असा काही प्रकार घडला आहे ? असे मुलीच्या आई – वडिलांनी तिला विचारले . मी शाळेतून घरी येत असताना ढेरंगे बाबा हा शेळ्या चारत होता . त्याने मला पैसे देऊन शेतात नेले व अत्याचार केले , असे तिने आई वडिलांना सांगितले . पीडित मुलीच्या आईने महादू ढेरंगे याच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला . सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार इनामदार यांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते . पीडित मुलीच्यावतीने विशेष सरकारी वकील बी . जी . कोल्हे यांनी काम पाहिले . यात एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले . न्यायाधीश कदम यांनी आरोपी ढेरंगे याला दहा वर्ष कारावासाची शिक्षा , दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे . या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार एस . डी . टकले , एस . डी . सरोदे , पोलीस हेडकॉन्स्टेबल पी . डी . डावरे , पोलीस कॉन्स्टेबल व्ही . ए . देशमुख , महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी , डी . वाय . दवंगे , एस . बी . डोंगरे यांनी काम पाहिले .