प्रक्षाळपूजेने विठ्ठलाचे पूर्वीप्रमाणे नित्योपचार सुरू!
कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेचे परंपरेनुसार २४ तास असते. त्यानुसार दर्शन ४ नोव्हेंबर रोजी श्रींचा पलंग काढून श्री पांडुरंगास लोड व श्री रुक्मिणीमातेस तक्या देऊन २४ तास दर्शन सुरू करण्यात आले होते. या २४ तास दर्शन कालावधीत देव २४ तास उभा असल्याने, मुहूर्त पाहून देवाची विधिवत प्रक्षाळपूजा करून श्रींचे पूर्वीप्रमाणे नित्योपचार सुरू करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
पूजेच्या पूर्वी संपूर्ण मंदिर स्वच्छ धुऊन घेण्यात आले. पहाटे नित्यपूजा झाल्यावर देवाच्या मूर्तीस चांदीचे पाऊल लावण्यात आले. त्यावर भाविक लिंबू-साखर लावतात. श्रींचा पलंग शेजघरामध्ये ठेवण्यात आला. दुपारी १२:२० ते १२:३० या वेळेत श्री पांडुरंगास पहिले स्नान घालण्यात आले. तसेच दुपारी २:२० ते ५:३० वाजेपर्यंत श्री पांडुरंगास रुद्राभिषेक अकरा ब्रह्मवृंदांमार्फत करण्यात आला. त्यावेळी देवास तेल लावून अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून दुधाचा अभिषेक करण्यात आला व देवाचा पोषाख, अलंकार व महानैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. यात्रेसाठी बंद केलेले काकड आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार सुरू करण्यात आले.
रात्री शेजारतीच्या वेळी देवाचा शिणवटा घालविण्यासाठी आयुर्वेदिक (विविध वनस्पती, सुकामेवा, सुंठ, काळे मिरे इ.) काढा देवाला दाखविण्यात आला. तसेच २१ नोव्हेंबरपासून भाविकांच्या हस्ते होणाऱ्या तुळशी अर्चनपूजा, पाद्यपूजा व नित्यपूजा देखील सुरू करण्यात येत आहेत.