बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी मोकाटेला अटक व्हावी आरपीआयचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी गोविंद अण्णा मोकाटे याला त्वरित अटक करून, त्याच्याविरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रोसिटीचा) वाढीव कलम लावण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाअध्यक्ष पवन भिंगारदिवे, कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलाम शेख, ओबीसी आघाडी शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष नईम शेख, युवक शहराध्यक्ष ऋषी विधाते, संदीप वाघचौरे, आजीम खान, जमीर इनामदार, मातंग आघाडीचे शिवम साठे, अभिजित पंडित, जावेद सय्यद, अरबाज शेख, विकी प्रभळकर, सोनू भंडारी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


इमामपूर (ता. नगर) येथील गोविंद अण्णा मोकाटे मातंग समाजातील मागासवर्गीय कुटुंबातील महिलेवर अनेक दिवसापासून लैंगिक शोषण करत होता. लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे मोकाटे याच्यावर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल होऊन देखील मोकाटे याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. नगर तालुक्यामध्ये गोविंद मोकाटे यांचे मोठे राजकीय वर्चस्व आहे. जिल्ह्यातील मोठे राजकीय नेत्यांशी त्याचे संबंध असल्याने राजकीय दबावापोटी त्याला अटक केली जात नसल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.

मोकाटे यांने एका सर्वसाधारण मागासवर्गीय महिलेचे सातत्याने लैंगिक शोषण केले आहे. पीडीत महिला मागासवर्गीय असल्याने मोकाटे यांच्यावर अनुसूचित जाती प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याने पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जाण्याची दाट शक्यता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर प्रकरणी बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी गोविंद अण्णा मोकाटे याला त्वरित अटक करून, त्याच्याविरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रोसिटीचा) वाढीव कलम लावण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे