बेकायदा वृक्षतोड करणार्‍या त्या ठेकेदारावर गुन्हे दाखल व्हावे

मौजे सावरगाव-पिंपळगाव (ता. पारनेर) गावाच्या हद्दीत बेकायदा वृक्षतोड करणार्‍या ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने नाशिक विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आले असल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील मौजे सावरगाव-पिंपळगाव हद्दीत वन विभागाकडून कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी झाडांची लागवड केली जात असताना, दुसरीकडे वाढलेली झाडांची कत्तल करुन पर्यावरणाचा र्‍हास केला जात आहे. वृक्षतोड करुन राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणार्‍या संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. वृक्षतोड झालेल्या मौजे सावरगाव-पिंपळगाव हद्दीत पंचनामे करुन वृक्षतोड करणार्‍या संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा पर्यावरण प्रेमी यांच्यासह 24 जानेवारी पासून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.