अन्यथा महावितरणवर मोर्चा – मनोज कोकाटे

गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक होत असलेली अडवणूक ८ दिवसांच्या आत थांबवावी अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी आज महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.लहामगे यांना निवेदनाद्वारे दिला.

यावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, गेल्या कित्येक दिवसांपासून महावितरण विभागाने कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता तालुक्यातील जनतेची जाणूनबुजून अडवणूक चालवली आहे. २ तासांचे भारनियमन वाढवून फक्त ६ तास वीज देण्याचा प्रताप महावितरण कडून चालू आहे. ६ तासही ती वीज शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने मिळत नाही. कर्मचारी मनाला वाटेल तसे काम करत असून वाटेल तेव्हा दुरुस्ती साठी फिडर बंद करून ठेवतात. अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर कुठलाही वचक नाही. लागवडीचे दिवस असताना महावितरण कडून शेतकऱ्यांची चाललेली अडवणूक ही अत्यंत निंदनीय बाब आहे. भाजपा नगर तालुक्याच्या वतीने याबाबत अनेक वेळा निवेदन दिलेले आहे परंतु महावितरणने गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळेच येत्या ८ दिवसात महावितरणने तालुक्यातील जनतेची जाणूनबुजून होत असलेली अडवणूक थांबवावी अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असे प्रतिपादन यावेळी कोकाटे यांनी केले.

यावेळी जेष्ठनेते माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड सर, युवराज पोटे, रमेश पिंपळे, शामराव पिंपळे, तालुका सरचिटणीस बाबासाहेब काळे, गणेश भालसिंग, तालुका उपाध्यक्ष पोपट शेळके, सागर भोपे, बबन शिंदे, महेश लांडगे, गोवर्धन शेवाळे, किशोर गायकवाड, पोपट बनकर, आनंदा साठे यांच्यासह आदी नगर तालुक्यातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.