भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे समाजकल्याण आयुक्तालय समोर उपोषण
सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान अहमदनगर या संस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश (महाराष्ट्र राज्य) संघटनेचे सोमवारी (दि.२७ फेब्रुवारी) पुणे येथील समाज कल्याण आयुक्तालय समोर उपोषण करण्यात येणार आहे.
न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण सुरु राहील , अशी माहिती राज्य उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी दिली.
सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानने केलेल्या कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार, कर्मचार्यांना न देण्यात आलेल्या मानधनाची, संस्थेच्या बँक खात्यातून संचालक मंडळ सदस्यांच्या वैयक्तिक खात्यावर घेतलेल्या रकमेची (पर्सनल प्रॉपर्टी), संस्थेच्या बँक खात्यावरुन सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय येथील दोन अधिकार्यांच्या खात्यावर गेलेल्या लाखो रुपयांची, बोगस दाखल केलेल्या ऑडिटची सखोल चौकशी करून सत्य सरकार समोर आणण्याची मागणी संघटनेने केली आहे.
तसेच २०१९ नंतर संस्थेत केंद्र शासनाचे अनुदान मिळण्यासाठी , संचालक मंडळाचा अनुदान मिळाल्यास व मिळण्यास मदत करणार्या व शासन निर्णयाची पायमल्ली करणार्या संबंधित सर्व समाज कल्याण अधिकार्यांची सक्षम त्रयस्त यंत्रणेकडून निपक्ष पारदर्शक चौकशी होऊन कारवाई करावी आणि भ्रष्ट संचालक मंडळ बरखास्त करून आश्रम शाळेवर त्वरित प्रशासकाची नेमणूक करावी. तसेच पीडित शिक्षक कर्मचार्यांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे.