मंत्री ना. अमित देशमुख, ना. थोरातांच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळीतील विविध घटकांचे प्रश्न सोडवू – किरण काळे

नगर शहराला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. चित्रपट, नाट्य, गायन, संगीत, साहित्य, काव्य अशा विविध क्षेत्रांत नगर शहराचे नाव मोठं करण्याचे काम अनेक कलावंतांनी केले आहे. हे काम होत असताना सांस्कृतिक चळवळीत काम करणारे अनेक चेहरे मात्र आजही प्रकाशझोतात आलेले नाहीत. शहरातील सांस्कृतिक चळवळीच्या बळकटीकरणासाठी काम करणाऱ्या विविध घटकांना त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी मदत करू, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांच्या पुढाकारातून नुकतीच शहरातील सांस्कृतिक चळवळीत काम करणाऱ्या विविध घटकांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी भारत सोळसे, सनी गवळी, धरमवीर राजपूत, अरुण वाघमोडे, अमोल साळवे, दिगंबर रोकडे, रामदास घुटे, सुहास तरंगे, खलील सय्यद, दशरथ शिंदे, अनंतराव गारदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, विशाल घोलप
आदी उपस्थित होते.

किरण काळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये सांस्कृतिक विभागाचे मंत्रीपद हे काँग्रेस पक्षाकडे असून ना.अमित विलासराव देशमुख यांच्यासारखे या क्षेत्राविषयी आस्था असणारा मंत्री या विभागाला लाभले आहेत. ना. बाळासाहेब थोरात व ना. देशमुख यांच्या माध्यमातून नगर शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींचे प्रश्न मार्गे लावण्याचे काम निश्चितच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करू.

सदाशिव अमरापुरकर, मधुकर तोरडमल, शाहू मोडक, अंजली-नंदिनी गायकवाड, मिलिंद शिंदे, मोहिनीराज गटणे, मेधा भास्कर (लेखिका) अशा अनेक नामवंतांनी नगर शहराचे नाव मोठे केले आहे. या चळवळीमध्ये काम करणाऱ्या विविध घटकांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. मात्र दुर्देवाने त्यांच्याकडे कुणी आजवर लक्ष दिले नाही. प्रा.डॉ.चंदनशिवे यांचा खांद्यावर शहरातील सांस्कृतिक विभागाची धुरा सोपविली आहे. काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाने चळवळीतील घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी घेतलेला पुढाकार हा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे यावेळी काळे म्हणाले.

प्रा.डॉ.बापू चंदनशिवे म्हणाले की, नगर शहर हे आज चित्रपट उद्योगासाठीचे एक महत्त्वाचे केंद्र बनू पाहत आहे. अनेक निर्माते चित्रपट, मालिकांचे शुटींग करण्यासाठी नगर शहराला प्राधान्य देत आहेत. या माध्यमातून स्थानिक कलावंतांना, तंत्रज्ञांना रोजगार निर्माण होण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत. किरण काळे हे स्वतः गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांचे शिष्य असून स्वतः उत्तम गायक आहेत. ते स्वतः कलाकार असल्यामुळे त्यांना कलावंतांच्या आणि सांस्कृतिक चळवळीतील काम करणाऱ्या घटकांच्या प्रश्नांविषयी आस्था आहे. त्यांच्या माध्यमातून आगामी काळात शहरातील सांस्कृतिक चळवळ बळकट करण्यासाठी पक्षाचा सांस्कृतिक विभाग काम करेल.