महालक्ष्मी मल्टीस्टेटच्या संचालकाचा फसवणुकीचा आनखी एक प्रताप
फसवणुकप्रकरणी सरकारी नोकरीत असलेल्या सुपेकरला निलंबित करण्याची मागणी
शहरात काही वर्षांपुर्वी ठेवेदारांच्या ठेवी घेऊन गाशा गुंडाळलेल्या महालक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या चेअरमन व तीच्या पतीने ठेवीदाराला पुणे येथे एका पब्लिक स्कूलसाठी कर्ज घेण्यास भाग पाडले. त्यानंतर फरार झालेल्या संबंधितांमुळे ठेवीदार कर्जबाजारी झाला असून, त्याला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. पिडीत ठेवीदार अमिता क्षीरसागर, प्रसाद क्षीरसागर व प्रशांत क्षीरसागर यांनी झालेल्या फसवणुकीमधून न्याय मिळावे, फसवणुकप्रकरणी स्कूलच्या संचालकांवर गुन्हा दाखल व्हावे व या प्रकरणात समाविष्ट असलेल्या सुरेश सुपेकरला सरकारी नोकरीतून निलंबित करण्याच्या मागणीचे निवेदन आरपीआय महिला आघाडीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा पिडीत क्षीरसागर कुटुंबीयांनी दिला आहे.
ठेवींवर 14 टक्के व्याजदर मिळत असल्याने अमिषाला बळी पडून शहरातील अनेकांनी गुलमोहर रोड येथील महालक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेत ठेवी ठेवल्या होत्या. काही वर्षापुर्वी ही पतसंस्था दिवाळखोरीत निघून, आपला गाशा गुंडाळला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत पतसंस्थेचे चेअरमन असलेल्या हेमा सुरेश सुपेकर वर गुन्हा दाखल आहे. अद्यापि त्या फरार आहेत. या फसवणुकीत ठेवीदार प्रसाद क्षीरसागर यांनी शेवगाव तालुक्यातील वडिलोपार्जित जमीन विकून मिळालेली 52 लाख रुपयाची रक्कम गुलमोहर रोड शाखा येथील महालक्ष्मी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीत ठेव म्हणून ठेवली होती. त्यावेळी संस्थेचे चेअरमन हेमा सुपेकर व तिचा पती सुरेश सुपेकर दोन्ही कामकाज पाहत होते. दोघांनाही ही डिपॉझिटची रक्कम पतसंस्थेत असल्याची कल्पना होती. त्यांचे पुतणे शैलेंद्र सुपेकर यांनी घरी येऊन पुणे येथे वर्चुअल पब्लिक स्कूल स्थापन केलेले असून, त्यासाठी पैशाची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगून, त्यांना मदत करण्याची विनंती केली. नकार देऊनही त्यांनी घरी येऊन वेळोवेळी तगादा सुरु ठेवला. पतसंस्थेत असलेल्या मुदत ठेवीवर संस्था ओवर ड्राफ्ट लोन करून देईल त्या कर्जाची परतफेड सर्वजण मिळून करतील. सदर कर्जाची परतफेडची कोणतीही जबाबदारी ठेवीदार क्षीरसागर यांच्यावर राहणार नसल्याचे आश्वासन दिले. तर ठेवलेल्या ठेवीवर 15 टक्के व्याजदर देण्याचे खोटे अमिष दाखवले. या ठेवीवर कर्ज काढण्यास त्यांनी शेवटी प्रवृत्त करुन कागदपत्रांवर सह्या घेऊन 44 लाख इतके कर्ज काढले. त्याच दिवशी बचत खात्यावर आलेली रक्कम शैलेंद्र सुपेकर यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आली. सदर रक्कम ही शैलेंद्र सुपेकर, विशाल सुपेकर, मनिष कुटे यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. तसेच पंधरा लाख रुपयांची रक्कम सबंधितांच्या सांगण्यावरुन रोहित बच्छाव यांना देण्यात आली. हे चौघे जण वर्चुअल पब्लिक स्कूलचे संचालक आहेत. ही पब्लिक स्कूल असतित्वात नसून, त्यांनी क्षीरसागर यांची फसवणुक करुन फरार झाले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
वर्चुअल पब्लिक स्कूलच्या संबंधित संचालकांनी महालक्ष्मी पतसंस्थेच्या ठेवीदाराला कर्ज काढण्यास भाग पाडून त्याची फसवणुक केली आहे. यामुळे कर्जबाजारी झालेल्या ठेवीदाराला आर्थिक विवंचणेपोटी जीवन जगणे देखील अवघड झाले असून, डोक्यावर कर्जाचा भार देखील वाढत आहे. फसवणुक प्रकरणी आरोपी असलेल्या हेमा सुपेकर यांचा पती सरकारी ऑडिटर म्हणून कामकाज पाहत आहे. या प्रकरणात तो देखील सहभागी असून, त्याला नोकरीतून निलंबित करुन अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.