महाशिवरात्रीनिमित्त केडगाव मध्ये अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याला प्रारंभ;
केडगाव उदयनराजेनगर येथे श्री विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . टाळ, मृदंगाच्या निनादात श्री ज्ञानदेव, तुकाराम महाराजांच्या जयघोषाने भक्तीचा गजर करीत हा सोहळा रंगला होता. सप्ताहाच्या प्रारंभी कलश, प्रतिमा, तुलसी, ग्रंथ व वीणा पूजनाचा धार्मिक सोहळा पार पाडला.
श्री विश्वेश्वर मंदिराच्या प्रांगणात सुरु झालेल्या या धार्मिक सप्ताहाचे उद्घाटन रविवारी (दि.१२ फेब्रुवारी) माजी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई सचिन जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक सचिन भानुदास कोतकर, नगरसेवक गणेश कवडे, मनोज कोतकर, सुनील (मामा) कोतकर, विजय पठारे, नगरसेविका लताताई शळके, शकुंतला पवार, ह.भ.प. महेश महाराज मडके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते, अशोक कराळे, मुकुंद दळवी, पोलीस निरीक्षक संपत शिंदे, उद्योजक जालिंदर कोतकर, प्रसाद आंधळे, राजू सातपुते, ह.भ.प. मुंडे महाराज, धाडे महाराज, मोकाटे महाराज, क्षीरसागर महाराज, सुधीर कार्ले आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ह.भ.प. महेश महाराज मडके म्हणाले की, कलियुगात भाविकांना नामस्मरणाने ईश्वर प्राप्तीचा सुख मिळतो. धकाधकीच्या जीवनात भक्तीमार्गाने जीवनात सुख, समाधान निर्माण होत असतो. सुख, समाधान प्राप्तीसाठी धर्म मंडपाशिवाय पर्याय नाही. येथूनच परमार्थाचा खरा मार्ग सापडतो. अखंड हरिनाम सप्ताहाने भावी पिढीवर संस्कार रुजत असतात. भरकटलेल्या युवक-युवतींना दिशा देण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाशिवाय पर्याय उरलेला नाही, असे ते म्हणाले.
सुवर्णाताई जगताप म्हणाल्या की, वारकरी संप्रदायामुळे समाजात संस्कृती व संस्कार टिकले आहेत. समाजप्रबोधनाने समाजाला दिशा दिली जात आहे. जीवनाला भक्तीमार्ग दाखविण्यासाठी युवकांना अखंड हरिनाम सप्ताह दिशादर्शक ठरत आहे. धार्मिकतेला समाजसेवेची जोड मिळाल्यास समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या सप्ताहात ह.भ.प. बाळासाहेब महाराज रंजाळे (श्रीरामपूर), सागर महाराज शिर्के (भीमाशंकर), भागवताचार्य दत्तात्रय महाराज हुके (परांडा), विकास महाराज शास्त्री (जामखेड), गौतम महाराज बेलगावकर (आळंदी), हरिदास महाराज पालवे शास्त्री (आळंदी) यांचे कीर्तन होणार आहे. तर बुधवारी (दि.१५ फेब्रुवारी) रोजी सायंकाळी ८ वाजता ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे कीर्तन असून सप्ताहातंर्गत दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी व शिवलीलामृत पारायण, सायंकाळी हरिपाठ व महाआरती तर रात्री हरिकीर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी चहा नाष्ट्यासह दुपारी व संध्याकाळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते।
रविवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भागवताचार्य ह.भ.प. महेश महाराज मडके (नेवासा) यांच्या काल्याचे किर्तनाने या सप्ताहाचा समारोप होणार आहे.