मारहाण करीत युवकला लुटले

दगडाने मारहाण करत व चाकूचा धाक दाखवून युवकाला लुटले. नगर तालुक्यातील चांदबीबी महालाच्या शेवटच्या वळणावर बारदरी शिवारात ही घटना घडली. या मारहाणीत आयुष मधुसूधन खंडेलवाल (वय 26 रा. समतानगर, सावेडी) हे जखमी झाले आहेत. नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन चोरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरांनी खंडेलवाल यांच्याकडील 20 हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप, रोख एक हजार रूपये, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, आधारकार्ड, डेबीट कार्ड, मतदान कार्ड घेवुन पोबारा केला. खंडेलवाल हे त्यांच्या कारमधून बारदरी शिवारातून जात असताना ते चांदबीबी महालाच्या शेवटच्या वळणावर थांबले होते .

त्यावेळी तेथे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी खंडेलवाल यांच्या डोळ्यावर दगडाने मारून जखमी केले. तसेच चाकूचा धाक दाखवून खंडेलवाल यांना लुटले.