लायन्स इंटरनॅशनलच्या संमेलनात प्रदेशाध्यक्ष संतोष माणकेश्‍वर यांचा गौरव

लायन्स क्लबच्या माध्यमातून वंचित घटकांना आधार देण्यासाठी विविध उपक्रम राबविणारे अहमदनगरचे इंजिनीयर तथा लायन्स क्लबचे प्रदेशाध्यक्ष संतोष माणकेश्‍वर यांचा शिर्डी येथे झालेल्या लायन्स इंटरनॅशनलच्या संमेलनात उद्योजक गिरीश मालपाणी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


शिर्डी येथील साई सृष्टी रिसॉर्टमध्ये रोअर हे लायन्स इंटरनॅशनलचे संमेलन पार पडले. वन औषधी झाडे लाऊन या संमेलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून आलेले क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. संतोष माणकेश्‍वर यांनी समाजाच्या गरजा ओळखून ते प्रश्‍न सोडविण्याची गरज आहे. समाज व देश विकासासाठी आपले योगदान काय असावे? यावर त्यांनी विचारमंथन केले. लायन्सच्या विविध क्लबच्या माध्यमातून 240 पेक्षा जास्त उपक्रम राबवून 75 हजार लाभार्थीं पर्यंत 24 लाख 50 हजार रुपयांचे सामाजिक मदत विविध प्रकल्पाद्वारे पोहचविण्यात आली असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. तर थिंक ग्लोबल अ‍ॅक्ट लोकलचा नारा त्यांनी दिला.


गिरीश मालपाणी म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारताच माणकेश्‍वर यांनी महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लाऊन विविध सामाजिक कार्य सुरु केले आहे. समन्वयाने सर्व क्लबला बरोबर घेऊन उत्तम प्रकारे सुरु असलेले त्यांचे कार्य प्रेरणा देणारे असून, क्लबमध्ये त्यांनी एक आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिर्डी लायन्स क्लबचे झोन चेअरपर्सन तथा शिर्डी संस्थानचे विश्‍वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन उद्योजक मालपाणी व माणकेश्‍वर यांच्या हस्ते झाले. या शिबीराचा दोनशेपेक्षा जास्त गरजूंनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजीत आचार्य व प्रा. सागर कुलकर्णी यांनी केले. आभार अर्चना माणकेश्‍वर व अ‍ॅड. संदीप गोंदकर यांनी मानले. संमेलनाचा समारोप गरजूंना अन्नदान करुन करण्यात आला.