शहरात अचानक वाढलेल्या थंडीत रस्त्यावर कुडकुडणार्यांना ब्लँकेटचे वाटप
शहरात अचानक वातावरणात बदल होऊन झालेला पाऊस व कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर, बस स्थानक, रेल्वे स्थानक येथील कुडकुडणार्या नागरिकांना तसेच हॉस्पिटल मधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना घर घर लंगरसेवेच्या वतीने ऊबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. बुधवारी (दि.1 डिसेंबर) रात्री भर पावसात मायेची ऊब देण्याचा हा उपक्रम अहमदनगर पोलीस दल व लायन्स क्लबच्या सहकार्याने राबविण्यात आला.
माणुसकीच्या भावनेने रस्त्यावर कुडकुडणार्यांना रात्री 2 वाजे पर्यंत हा ब्लँकेट वाटपचा उपक्रम सुरु होता. यावेळी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, घर घर लंगर सेवेचे हरजीतसिंह वधवा, प्रशांत मुनोत, जय रंगलानी, सुनील छाजेड, राहुल बजाज, करण धुप्पड, मनोज मदान, मनू कुकरेजा, कैलास नवलानी, सुनील थोरात, पवन झंवर उपस्थित होते.
घर घर लंगर सेवा मागील दोन वर्षांपासून गरजूंना विविध प्रकारची मदत पोहचवीत आहे. गरजूंची गरज ओळखून अनेक उपक्रम राबविण्यात आले असून, ब्लँकेट वाटपास शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून सुरुवात करण्यात आली. स्वस्तिक चौक, माळीवाडा बस स्थानक, दिल्लीगेट, जिल्हा रुग्णालय, कोठला स्टॅण्ड, तारकपूर बस स्थानक, आनंदऋषीजी हॉस्पिटल, शहरातील विविध ठिकाणी तसेच सावेडी परिसरातील गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
अनेक नागरिक बस स्थानक व रेल्वे स्थानक येथे गाड्याची वाट पाहत थंडीत कुडकुडत होते. अचानक वाढलेल्या थंडीमुळे अनेकांना काही सोय नव्हती. काहींची आर्थिक परिस्थिती चांगली असून, देखील सोय नसल्याने या ब्लँकेटचा आधार घ्यावा लागला. तर उघड्यावर जीवन व्यतीत करणार्यांना या ब्लँकेटचा मोठा आधार झाला.