शासन-प्रशासनातील व्यवस्थापनात बदल होण्यासाठी उन्नत शिवचेतना तंत्र स्वीकारण्याचा आग्रह

शिवाजी महाराजांचे कल्याणकारी राज्य उदयास आणण्याचा संकल्प

शासन-प्रशासनातील व्यवस्थापनात क्रांतीकारक बदल होण्यासाठी उन्नत शिवचेतना तंत्र स्वीकारण्याचा आग्रह पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आला आहे. उन्नत शिवचेतना अंगीकारल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे कल्याणकारी राज्य उदयास येणार असून, या अभियानाचे प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनीपासून (19 फेब्रुवारी) केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात दिल्लीपासून गल्लीपर्यंत भ्रष्टाचार, अनागोंदी, टोलवाटोलवी सर्वत्र दिसून येते. शासन-प्रशासन अपेक्षेप्रमाणे जनतेसाठी कुशलतेने राबत नाही. नोकरशाही पगार हमी योजनेवर काम करते. पगाराव्यतिरिक्त भ्रष्टाचाराचे पैसा आणि त्याच वेळेला आजचे काम उद्या आणि उद्याचे काम कधीही नाही अशी सर्वत्र प्रवृत्ती दिसून येत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद रोडला स्थलांतरित करण्यात आले. परंतु जुने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्वत्र कुत्रे झोपलेले आढळून येतात. स्थलांतरामुळे जुन्या इमारतीमधील अनेक इमारती रिकाम्या झाल्या आहेत. व्यवस्थापन तंत्राचा वापर करून त्या ठिकाणी नवीन सरकारी कार्यालय नक्कीच सुरू करता येणार आहे. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री हे पाहुणे मंत्री आहे. त्यांचा जिल्ह्यातील कारभारावर काहीएक वचक राहिलेला नाही. पालकमंत्री व्यतिरिक्त नगर जिल्ह्यात तीन मंत्री आहे. परंतु आपल्या मतदारसंघात या मंत्र्यांचे कार्य सुरू आहे. एकंदरीत सर्वच मंत्री आणि राज्य सरकार बाबत जनता पूर्णपणे निराश आहे. जिकडे-तिकडे फक्त कोरोनाच्या नावाखाली अनागोंदी सुरू असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये जनतेच्या कामाला काही एक प्राधान्य नाही. त्यामुळे संघटनेने जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्राचा आग्रह धरला आहे. पगार हमी योजनेवरील नोकरशाहीला घरी पाठवल्याशिवाय नोकरशाहीला शिस्त लागणार नाही. जनतेचे उठाव आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी तसेच मंत्र्यावर जनतेने आपल्या मागण्यांचा प्रभाव पाडला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्रंदिवस जनतेला प्राधान्य देऊन त्यांच्या हिताचे कार्य केले. मात्र स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात सगळीकडे मरगळ आणि निराशा पसरलेली आहे. याचे प्रमुख कारण मतदार आपली मते विकतात आणि भ्रष्ट सत्तापेंढारी सत्तेत येऊन सरकारी तिजोरीवर डल्ला मारतात. यासाठी उन्नत शिवचेतना तंत्राचा स्वीकार सर्वत्र शासन-प्रशासन आणि व्यवस्थापनामध्ये होण्याचा आग्रह संघटनेने धरला आहे.