स्वामी समर्थांच्या प्रासादिक पादुका दि.११ ला नगरमध्ये

नगर – अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गेल्या २५ वर्षापासून नगर शहरात येत असलेल्या स्वामी समर्थांच्या प्रासादिक पादुकांचे आगमन शुक्रवार दि.११ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९ वाजता नगर शहरात होणार आहे, अशी माहिती श्री.योगेश मुळे व श्री.राजू ढोरे यांनी दिली.

ते म्हणाले, शुक्रवार दि.११ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९ वाजता सावेडीमधील वृंदावन काॅलनी येथील स्वामीमय या बंगला नं.१३ मध्ये पादुकांचे आगमन होऊन पूजासोहळा संपन्न होईल. सकाळी ११ वाजेपर्यत पादुका तेथे रहातील. त्यानंतर पादुकांचे प्रस्थान होऊन त्या सकाळी ११.३० ते दुपारी २ या वेळेत शांताईनगर, आनंद पार्क, कल्याण रोड येथे भाविकांच्या दर्शनासाठी थांबतील. दुपारी ३ ते ४ या वेळेत केडगांवला थांबून सायंकाळी ५ वा श्रीगोंदा येथे पोहोचतील. एक तास तेथे थांबून सायंकाळी ६ वाजता तेथून प्रस्थान करून मुक्कामी कर्जतला जातील.
स्वामीभक्तीचा प्रसार करण्यासाठी सबंध महाराष्ट्रभर आणि शेजारील राज्यामध्ये श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा गेल्या २५ वर्षांपासून सुरू आहे. २०१९-२०२० ची पालखी परिक्रमा कोरोनाच्या प्रादुर्भावाने झालेल्या लॉकडाऊनमुळे मध्येच स्थगित करण्यात आली. तसेच २०२०-२०२१ यावर्षी देखील पालखी परिक्रमा कोरोनाचे लॉकडाऊनमुळे स्थगित ठेवण्यात आली होती. सध्या कोरोना प्रादुर्भाव कमी होऊन सर्व जनजीवन सुरळीत होत आहे. अन्नछत्रमध्ये अन्नदान सेवा सुरु झाली आहे. यंदाचे वर्षी पालखी परिक्रमेमध्ये पालखी व वारकरी यांचा समावेश असणार नाही. स्वामी भक्तांची पालखी परिक्रमेची मागणी होती पण कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे परिक्रमेत पालखी पाठविता येत नसल्याने फक्त प्रासादिक पादुका परीक्रमाचे आयोजन केले आहे. श्री स्वामी समर्थांच्या प्रासादिक पादुकांचे महाराष्ट्रात निश्चित केलेल्या ठिकाणी दि.२५ नोव्हें २०२१ रोजी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातून प्रस्थान झाले आहे. या प्रासादिक पादुकांची परिक्रमा जवळपास ८४ दिवसांची आहे. परिक्रमा खंडित राहू नये तसेच स्वामीभक्तांना पालखी परीक्रमेचे विस्मरण होऊ नये यासाठी प्रासादिक पादुकांचे परिक्रमा आयोजन केले आहे.
नगर शहरातील स्वामी भक्तांनी आपल्या सोयीच्या स्थळी पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्वश्री. एस.आर.जोशी, योगेश मुळे, राजू ढोरे, मिलिंद चवंडके, लक्षीकांत ढोरे यांनी केले आहे.