शिवाजी महाराजांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध -आमदार संग्राम जगताप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन

महाराष्ट्राच्या अस्मितेचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव. संपूर्ण जगात असलेल्या महाराष्ट्राच्या मातीतला माणूस हा जयंती उत्सव साजरा करत असतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन आजही महाराष्ट्रासह जिल्ह्याची वाटचाल प्रगती पथाकडे सुरू आहे. त्यांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील जुने बसस्थानक येथे असलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास आमदार जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उपमहापौर गणेश भोसले, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, नगरसेवक प्रकाश भागानगरे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, संजीव भोर, अ‍ॅड. शिवाजी कराळे, राष्ट्रवादी युवतीच्या अंजली आव्हाड, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर, निलेश इंगळे, अजय दिघे, गणेश बोरुडे, सागर गुंजाळ, नैना शेलार, सुप्रिया काळे, सुजाता दिवटे, योगीता कुडीयाल, साधना बोरुडे, दिपक बडदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते यांनी स्वराज्य सहजा-सहजी मिळाले नाही, स्वराज्यासाठी अनेकांचा त्याग व बलिदान आहे. ही जाणीव ठेऊन महाराजांचे मावळे या नात्याने त्यांचे विचार अंगीकारण्याची गरज आहे. महाराजांचे शौर्य, माणुसकी, रणनिती व प्रजेसाठी असणारे प्रेम त्यांचे कार्य व विचार आज प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.